Friday, November 24, 2017

Mexico- A Shaken Vacation



सोमवार १८ सप्टेंबर २०१७ ची सकाळ उजाडली तीच मुळी गडबडीत.  HELLAच्या North -South अमेरिकेमधील मॅनेजर्सचं 'LEAD  COMPASS' चे Queretaro, Mexico ला वर्कशॉप, US व्हिसाचं मेक्सिको सिटी मध्ये रिन्यूअल आणि मग पूनम, रेवा समवेत मेक्सिको, पिरॅमिड्स दर्शन असा एकाच दगडात तीन पक्षी मारायचा जंगी प्लॅन होता. दुपारी ३च्या फ्लाईटसाठी, सकाळच्या काही मिटींग्स संपवून मग १२ ला विमानतळावर पोहोचायचं होतं.  त्यात रेवा (वय वर्षे २) ला स्थळ-काळ-वेळ ह्याच्याशी काही देणंघेणं नसल्यामुळे, तिला वेळेत तयार करणं हे फक्त पूनम (बायको ) लाच जमू जाणे.

११ पर्यंत मिटींग्स संपवून राईड बुक करायला उबर अँप ओपन करून बघितलं तर एकही कॅब जवळपास नव्हती. सगळ्या कॅब्स ४५मिनिट्स च्या अंतरावर आणि विमानतळावर पोहोचायला लागतात ४०मिनिट्स म्हणजे आम्ही केवळ १.५तास आधी पोहोचणार होतो आणि international flight ला तेवढे पुरेसे नव्हते. सोमवार असल्यामुळे ओळखीचे पण सगळे ऑफिस मधे त्यामुळे सोडायला पण कोणी नाही, म्हटलं  झालं आता १२ ला पोहोचलोच आपण. शेवटी एक कॅब कंपनी २०मिनिट्स मध्ये कॅब द्यायला तयार झाली. फोनाफोनी करत डेट्रॉईट च्या विमानतळावर साधारण १ ला पोहचलो. ड्रॉप ऑफ पॉईंट वर कॅब जात असताना आमची 'ऐरो मेक्सिको' एअर लाईन कुठेच दिसेना. कॅब ड्राइवरला विचारलं  तर म्हटला आत चौकशी करा, तेच तुम्हाला सांगतील. बरं म्हटलं अन मी, पूनम आणि रेवा पटापटा  खाली उतरुन, लगेज घेऊन एअर लाईनचा काऊंटर शोधायला लागलो.

५-१० मिनिट्स शोधाशोध केल्यावर शेवटी एका एअरपोर्ट स्टाफ ला विचारलं तर म्हणाली, "मी इथे २० वर्ष झाली नोकरी करतीये, पण डेल्टाचं फ्लाईट इथून कधीच गेलं नाहीये. तुम्ही चुकीच्या टर्मिनलला आला आहात." मी एकदा तारीख आठवून बघितली, १ एप्रिल तर नाहीये ना आणि मग घड्याळ बघितलं, फ्लाईट सुटायला आता फक्त दीड तास राहिला होता. लगेचच त्या हुशार,अनुभवी(!) ड्राइवर ला फोन केला आणि म्हटलं जिथे असशील तिथून परत फिर आणि आम्हाला योग्य टर्मिनलला सोड. मनातल्या मनात म्हटलं  ५०० वर्षांपूर्वी तो कोलंबस चुकला, इंडिया ला जाताजाता अमेरिकेला पोहोचला आणि आता हा अस्सल अमेरिकन कॅब ड्राइवर एका इंडियन ला अमेरिकेत हुलकावणी देतोय. 

आमची धावपळ बघून काही स्टाफ मेम्बर्सनी आम्हाला टर्मिनल टू टर्मिनल बस सर्विस वापरायचा सल्ला, पुणेरी आत्मविश्वासाने दिला आणि बस स्टॉपचा पत्ता पण सांगितला. तिथे जाऊन बघितलं तर ती बस-सेवा फक्त स्टाफ साठी होती असं कळलं. तेवढयात आमचा कोलंबस आला आणि आम्ही परत त्या कॅब मधून इप्सित टर्मिनलला जायला निघायलो. योग्य टर्मिनलला पोहोचेपर्यंत प्रस्थानाला आता फक्त १ तास राहिला होता. टर्मिनल वर पोहचलो तर बाहेर हि भलीमोठी गाड्यांची लाईन. कोलंबस ला म्हटलं मी ट्रॅफिक मध्ये उतरून पुढे जातो, तू आमचं लगेज आणि कुटुंबकबिला घेऊन मागून ये. 
मी अगदी ४५मिनिट्स बाकी असताना (गेट बंद होण्याची वेळ) काऊंटर वर पोहोचलो आणि चेक-इन केलं, नशिबाने त्यांनी काही कुरबुर केली नाही आणि फर्स्ट क्लास ला अपग्रेड करून दिला. तो पर्यंत पूनम, रेवा आणि कोलंबस लगेज घेऊन पोहचले होते. शेवटी कोलंबस चा निरोप घेऊन आम्ही इमिग्रेशन चे सोपस्कार पार पाडायला पुढे गेलो. जाता जाता मनामध्ये एकाच विचार, आपण किती नशीबवान आहोत- फ्लाईट मिळाली ती पण अपग्रेड होऊन. प्रवासाची सुरुवात तर एकदम धमाकेदार झाली होती. 



बदाम, पिस्ते आणि वाईनचा अस्वाद घेत घेत विमान प्रवास सुरु झाला. ५, ५:३० तासांनी विमान मेक्सिको सिटी वर घिरट्या मारायला लागले. बाहेर डोकावून बघितलं तर खाली आकाशात गोल इंद्रधनुष्य पडलं  होता. रेवानी पहिल्यांदी इंद्रधनुष्य बघितलं अन तेही गोल. पुन्हा एकदा मी आणि पूनमनी रेवाच्या अन आमच्या नशिबाला दाद दिली. 

डेट्रॉईट ते मेक्सिको सिटी ची मजल दरमजल करत शेवटी आम्ही आमच्या हॉटेल वर संध्याकाळी ७:३० ला पोहचलो. हॉटेल च नाव होतं 'Emporio Reforma'. रिसेप्शन वर आम्हाला विचारलं कितव्या मजल्यावर रूम हवीये, १ ला, ३ रा, ७वा, १० व्वा.आम्ही मेक्सिको सिटीचे चांगले दर्शन व्हावे म्हणून  १० व्या मजल्यावर चा स्वीट बुक केला. लिफ्ट मधून वर जाताजाता मी पूनम ला म्हटलं, आम्हाला ट्रॅव्हल गायडन्स असतो कि शक्य तितक्या खालच्या मजल्यावर रूम घ्या म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोगी पडतं. एवढ बोलून आम्ही तो विषय तिथेच राहिला आणि दुसऱ्या दिवशी ६:३० ची US Embassy ची अपॉइंटमेंट असल्यामुळे जेवून झोपायच्या तयारीला लागलो. 



मंगळवार १९सप्टेंबर २०१७ ला सकाळी US embassy ला जाऊन आलो आणि सगळं सुरळीत पार पडल्याच्या आनंदात जंगी ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या रूम वर जरा आराम करत पडलो होतो. १०व्या मजल्यावरून मेक्सिको सिटीचा सुंदर नजारा दिसत होता. नजर जाईल तिकडे स्काय स्क्रेपर्स आणि वरून मुंगी एवढ्या दिसणाऱ्या गाड्या अन त्याहून लहान लहान माणसं. १७मिलियन  (१.७ कोटी), जगातली ५व्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर, नजर जाईल तिकडे इमारती आणि धाब्याच्या घरांनी गजबजलं होतं. १६व्या शतकाच्या सुरुवातीपासून स्पेनची कॉलोनी असलेल्या शहराचा पसारा पाहून अचंबित व्हायला होत होतं.

सिटी टूर मध्ये कुठे जायचं, ह्याची यादी करून दुपारी साधारण १२:३० च्या आसपास आम्ही बरोबर आणलेले पराठे, तिखट मिठाच्या पुऱ्या गरम करून रूम मधेच जेवायला बसलो. रेवा नेहमी प्रमाणे इकडून तिकडे उड्या मारत होती आणि आम्ही तिनी खावं म्हणून तिच्या हातापाया पडत होतो. तरीही रेवा आमच्या कडे दुर्लक्ष करून सोफा ओढ, खुर्च्या, टेबल ढकल असे शक्तीचे प्रयोग करून तिला अजून अन्नाची/energy ची गरज नाहीये हे दाखवून देत होती. खुर्च्या-टेबलांबरोबर tv कॅबिनेट आणि रूम मधले दिवे पण हलायला लागले. मी आणि पूनम एकमेकांकडे आश्चर्य आणि भितीनी "हे काय होतंय", असं बघत होतो. काही क्षणात आमचे काटे चमचे, डिश सगळंच थरथरायला लागलं. पुढच्या काही सेकंदामध्ये आम्हाला अंदाज आला हे रेवाचे प्रताप नसून काहीतरी भलतंच घडतंय. भिंतींमधून थरथर ऐकू यायला लागली आणि  सगळंच हेलकावायला लागलं. दोघंही एकदम ओरडलो, "भूकंप, भूकंप! पळ लवकर!!". 


क्षणाचाही विलंब न लावता रेवा ला बखोटीला मारून रूम च्या बाहेर धाव घेतली. पूनम पण आमच्या मागोमाग बाहेर पडली. बाहेर कॉरिडॉर मधे बघितलं तर सगळे दिवे उघडझाप करत होते  मी लागलीच जिन्याचा रस्ता धरला. दोन तीन पायऱ्या उतरून पूनम कुठे आहे ह्याचा अंदाज घ्यायला मागे बघितलं, पूनम पायात शूज घालून पायऱ्या उतरायच्याच तयारीत होती. मग मला आकलन झालं आपल्या पायात तर काहीच नाहीये आणि माघारी फिरून शूज घालायची वेळ पण निघून गेली होती. मी रेवाला घेऊन तसाच खाली उतरायचा निर्णय घेतला.


(आपत्कालीन परिस्थितीत एलेव्हेटर चा वापर करू नये आणि कुठल्याही valuable वस्तू बरोबर घेण्याच्या फंदात पडून नये हे office च्या fire मॉकड्रील मध्ये खूप बिंबवण्यात येतं त्यामुळे रेवा आणि पूनम ला सोडून बरोबर काही घ्यायचा आणि एलेवेटर वापरायचा विचार हि मनात आला नाही.)

डाव्या हातात रेवाला पकडून, पूनमला बरोबर घ्यायला दुसरा हात पुढे केला तर कळलं आपल्याला धड उभं पण राहता येत नाहीये आणि हॉटेल चा तो १०वा मजला माझ्या भोवती फिरतोय असं वाटायला लागलं. जिन्याचा कठडा पकडायचा प्रयत्न केला तर तो पण जोरजोरात हेलकावे घेत होता. शेवटी पूनमनीच मला आधार दिला आणि मी कसाबसा तोल सावरला.
जसा जसा परिस्थितीचा अंदाज यायला लागला तसं कळलं सगळी बिल्डींगच दोलायमान स्थितीत आहे. स्वतःचा तोल सावरत, एका हातानी रेवाला घट्ट कवटाळून घेत, एक एक करून पायऱ्या उतरायला लागलो. विचार येत होते, १०व्या मजल्यावरून तळमजल्या पर्यंतचा प्रवास फार मोठा आहे, बरोबर दोन 'जीव कि प्राण' आहेत त्यांना घेऊन कसंही करून इथून बाहेर पडायचंय. एखाद दोन जिने उतरून आलो असू अन उघडझाप करणारे सर्व दिवे बंद झाले आता जिन्यांमध्ये केवळ आपत्कालीन दिव्याचा एक मंद पिवळा प्रकाश पसरला होता. अजूनही सगळे कठडे झुलत होते अन एक प्रकारचा कर्रर्रकर्रर्र आवाज करत होते...वाटत होतं हे कधीही उखडून पडू शकतात. जिन्यांमधील लाकडी कपाटाचे दरवाजे, हत्तीनी त्याचे कान उघडझाप करावेत तसे फडफड करत होते. भूकंपाच्या कंपनांमुळे कपाटांचं plywood, जिन्याच्या भिंतीचं प्लास्टर उखडायला सुरुवात झाली होती. एव्हाना आम्ही ७व्या मजल्यापर्यंत पोहोचलो होतो म्हणजे फक्त ३०% प्रवास झाला होता आणि अजून ७०% बाकी होता. म्हटलं हि प्रगती फारच तोकडी आहे, Emergency Exit शोधलं पाहिजे नाहीतर आपली इहलोकातून exit अटळ आहे. 

आता मेंदू जरा सावरला होता. रेवा, पूनम आणि स्वतःला ला सांभाळत-संभाळत नजर Emergency Exit चा शोध घेत होती. इतका वेळ कुठेच लाल रंगातली EXIT अक्षरं दिसली नव्हती. पुढचा जिना उतरून आलो तेवढ्यात हॉटेल स्टाफ मधली एक बाई दिसली, तिच्याजवळ आल्यावर कळलं, भितीनी तिची दातखीळ बसलीये आणि ती जागच्या जागी थिजून गेलीये. ती हातानी केवळ येशू च्या आणाभाका करत होती. तिच्या डोळ्यातलं भय आणि असहायता, मला तिच्या जवळ येत येता जाणवत होती. तेवढ्यात रडवेल्या चेहऱ्यानी तिनी म्हाला खाली जायची खूण केली. तिला ओलांडून जाताना एकच विचार येत होता, हीचं काय होणार? पण परिस्थितीने लाचार आम्ही, तिनी सुचवल्याप्रमाणे खाली जात राहिलो. 

६व्या मजल्यावर एक हिरवी 'Salido' लिहिलेली glow sign दिसली. हीच 'ती' EXIT ची पाटी असावी हे गृहीत धरण्यावाचून अजून कुठलाच पर्याय नव्हता. हॉटेल ची बिल्डिंग अजूनही थरथरत आणि झुलत होती. आम्ही जीन्याचा मार्ग सोडून देऊन त्या पाटीवर दाखवलेल्या बाणाप्रमाणे जायचं ठरवलं. 
(नंतर दुसऱ्यादिवशी इतरांशी बोलताना कळलं स्पॅनिश मध्ये Salido म्हणजेच Exit पण त्याचा रंग हिरवा का असावा हे आत्तापर्यंत कळलं नाहीये. माझ्या मते कुठल्याही आपत्कालीन सूचनांचा रंग हा लालच हवा. मनुष्य शिकार करत असल्यापासून त्याच्या मेंदूमध्ये लाल रंग म्हणजे त्वरितता/ धोकादायक ह्याचा प्रोग्रॅम फिट आहे.)  

त्या बाणानी दाखवल्याप्रमाणे गेल्यावर एका छोट्या बोळात एक दरवाजा होता. तो दरवाजा उघडला तर शेजारच्या बिल्डिंगच्या गच्चीवर, लोखंडी जिन्यानी पलीकडे उतरायला रस्ता होता. दरवाजा उघडून जसं पलीकडे पाऊल ठेवायला खाली बघितलं तर आमची बिल्डिंग शेजारच्या बिल्डिंग वर आपटताना दिसली. दोन्ही बिल्डींग्स मध्ये साधारण २-३ फूट अंतर असेल आणि आमच्या बिल्डिंग च्या सळया शेजारच्या बिल्डिंग मध्ये घुसत होत्या अन खालच्या मजल्यापर्यंत आरपार दिसत होतं. रेवाला कडेवर घट्ट पकडून शेजरच्या बिल्डिंग वर उडी मारली, पाठोपाठ पूनम पण आली. गच्चीच्या फरश्यांवर लाल रंगानी बाण काढले होते Exit साठी. आम्ही तिघंही जणं त्या गच्चीवर धावायला लागलो. वातावरणामध्ये एक प्रकारची भयानक शांतता होती, फक्त बिल्डींग्सची थरथर आणि जमिनीवर स्लॅब्स पडायचे, काचा फुटायचे आवाज. आजूबाजूला, वर-खाली बघितलं तर आम्ही तिन्ही बाजूनं बिल्डींग्स नि घेरलो गेलो होतो. आता वाटायला लागलं आपण असं उघड्यावर येऊन चूक तर नाही ना केली. गच्चीच्या टोकाला एक लोखंडी जीना होता आणि तो पण थडथड करत होता पण तो खरंच exit आहे कि नाही ह्याची आम्हाला खात्री होत नव्हती. आम्ही भांबावून जाऊन, सैरावैरा झालो होतो. सुटकेचा मार्ग सापडत नसल्यामुळे आता घशाला कोरड पडली होती. एकमेकांशी काहीही न बोलता आम्ही परत हॉटेल च्या बिल्डिंग मध्ये जायचा रस्ता शोधायला लागलो. 
परत त्या emergency exit पाशी आलो तर तिथेच शेजारी electric मीटर्स चा panel बघून आम्ही जरा टरकलोच. येताना दरवाज्याच्या मागे तो पॅनल लपल्यामुळे आम्हाला तेंव्हा कळलं नाही कि आपण किती risky दरवाज्यातून आलोय. परत आम्ही त्या दोन इमारतींच्या भेगेवरून हॉटेलच्या बिल्डिंग मध्ये उडी मारली. मनामध्ये विचार चमकून गेला, गच्चीवर घालवलेली २-४ मिनिटं कारक ठरतील कि मारक? हॉटेल जर कोसळलं तर गच्चीवर घालवलेली काही मिनिटं घात करणारी ठरणार होती.


आता परत ६व्या मजल्यावरून तळमजल्याचा प्रवास सुरु झाला होता. ४थ्या मजल्यावर आलो तेवढ्यात  पायऱ्यांवरून पाणी वहात यायला लागलं. वरच्या कुठल्या तरी जिन्याच्या भिंतीतून जाणारी वॉटरलाईन ब्रेक झाली होती. आमच्या डोक्यावर वरून पाणी पडायला लागलं आणि पायऱ्यांवर साचयाला लागलं. मी एकच प्रार्थना करत होतो की आता कुठे शॉर्टसर्किट व्हायला नको आणि करंट पाण्यात उतरायला नको. I was feeling so helpless पण मनामध्ये एवढीच खूणगाठ मारली होती की इथून बाहेर पडायचंच. मनाचा हिय्या करून साचलेल्या पाण्यात पाय घट्ट रोवून पायऱ्या उतरायला लागलो. आता वाटलं शूज घातले असते तर रेवाला घेऊन तोल सावरणं अवघड गेलं असतं. अनवाणी पायानी पायऱ्यांवर चांगली पकड येत होती आणि पायऱ्या उतरताना सोपं जात होतं. ३ऱ्या मजल्यावर येई पर्यंत सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. भिंतींचं, छताचं प्लास्टर उखडून येत होतं आणि आमच्या डोक्यात, तोंडात सगळी धूळ जात होती. आता बहुदा भूकंपाची कंपनं कमी झाली होती कारण आम्ही पटापट उतरू शकत होतो. शेवटी एकदाचे तळमजल्यावर पोहोचलो. हॉटेल स्टाफचा एकजण तिथे उभा राहून बाहेर पडायचा मार्ग दाखवत होता. फ्रंट लॉबी मधून पाळताना बघितलं तर जमिनीवरच्या मार्बलला तडे गेले होते आणि छताला टांगलेली झुंबरं हेलकावे खात होती, त्यातल्या काही हंड्या जमिनीवर पडून जमिनीवर काचा पसरल्या होत्या. त्यातून वाट काढत आम्ही तिघं जणं हॉटेलच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर पडलो. बाहेर रस्त्यावर, फूटपाथवर खिडकीच्या काचांचा सडा पडला होता आणि त्यातून आम्ही वाट काढायचा प्रयत्न करत होतो आणि मी अनवाणी जितकं जमेल तितकं जपून पाऊल टाकत होतो. तेवढ्यात कोणीतरी हॉटेल स्टाफने माझ्या पायात पांढऱ्या वेल्वेटच्या चपला सरकावल्या आणि आम्हाला Emergency assembly point कडे जायला सांगितलं. एका बोळामध्ये असलेल्या त्या Assembly point पाशी साधारण ५०-६० लोकं जमली होती. तिथे आम्ही पण जाऊन उभे राहिलो. तेवढ्यात वरून एक मोठं काचेचं तावदान आमच्या शेजारी येऊन कोसळलं.


सगळी लोकं सैरावर धावायला लागली आणि आम्ही पण त्या घोळक्याबरोबर मुख्य रस्त्यावर आलो. रस्त्यावरची रहदारी पूर्णपणे ठप्प झाली होती आणि आसपासच्या बिल्डींग्स मधली सगळी लोकं एव्हाना रस्त्यावर उतरली होती. नजर जाईल तिकडे लोक आणि गाड्या दिसत होत्या. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच असहाय्यता आणि प्रश्न दिसत होता, 'आता पुढे अजून काय घडणारे?' हॉलिवूड चा एखादा थरारपट पाहून, जगून बाहेर आलोय असा वाटत होता. रहदारी सुरु करण्यासाठी लोकांचा जमाव हळूहळू पांगायला लागला. एवढ सगळं होऊन देखील कुठल्याही गाडीनी लेनची शिस्त मोडली नव्हती. सगळी लोकं फूटपाथ, रोड डिव्हायडर वर गर्दी करत होते. आम्हीपण फूटपाथ वर थांबलो होतो तेवढ्यात सगळी लोकं रस्त्याच्या पलीकडे जायला लागली. सगळे स्पॅनिश असल्यामुळे कोणी इंग्लिश मध्ये काही बोलत, सांगत नव्हते. नंतर कळलं कि ज्या बिल्डिंगच्या जवळ आम्ही उभे होतो ती कोसळत असल्याची कुणकुण काही लोकांना लागली होती. आम्ही आता रस्त्यापलिकडच्या एका पार्कमधे जाऊन थांबलो. पूनमला हाताला खरचटलं होतं त्यावर प्रथमोचार करून आम्ही एका झाडाखाली विसावलो. रेवाला गालाला जरासा खरचटलं होतं आणि माझ्या पायात काचेचा एक तुकडा घुसला होता, जो मी उपटून काढून टाकला. एवढ्या सगळ्या प्रकारात रेवानी काहीही त्रास दिला नाही, रडारड केली नाही ह्याचं कौतुक वाटत होतं. बिचारी भेदरून मला बिलगून बसली होती. ती पूनमलाच समजावत होती, "Don't cry mommy, I am here. Don't worry".
समोर आमच्या हॉटेलची बिल्डिंग अजूनही उभी दिसत होती. शेजारच्या बिल्डिंग चे स्लॅब कोसळताना दिसत, ऐकू येत होते. पूनम आणि मी एवढाच विचार करत होतो, जर आपलं हॉटेल कोसळलं तर आपले मोबाइल, पैसे, पासपोर्ट, license सगळं ढिगाऱ्यामध्ये जाणार. प्रश्न पडत होता आपण परत कसं जायचं? US Embassy मध्ये व्हिसा रिन्यूअल असल्यामुळे सगळी educational, लग्नाचे ओरिजिनल सर्टिफिकेट्स पण बरोबर होती आणि तीपण ढिगाऱ्याखाली जाणार. मग परत जायला आपली आयडेंटिटी कशी पटवून देणार? 
दुपारचे २ वाजले होते पण आम्हाला तहान-भुकेची जाणीव होत नव्हती. रेवा थोडंसं पाणी पिऊन माझ्या खांद्यावरच झोपून गेली. बरोबर फोन नसल्यामुळे कोणाला फोनही करता येत नव्हते. मोबाइल वापरायला लागल्यापासुन कोणाचे नंबर पाठ असायचे दिवसही संपले होते. 

आम्ही हताशपणे तसेच बसून होतो. शेजारी इंग्लिश बोलणाऱ्या काही टुरिस्ट ladies चा ग्रुप होता त्यातल्या एका बाईंनी त्यांचा फोन वापरायला दिला पण इंटरनेट  
बंद पडलेलं असल्यामुळे ऑफिस चा नंबरही सर्च करता येत नव्हता. त्या बाईंना जेंव्हा कळलं कि आम्ही नेसत्या कपड्यानिशी बाहेर पडलेलोय, त्यांनी आम्हाला काही डॉलर्स पण देऊ केले. त्यांचे आभार मानून आम्ही ते नम्रपणे नाकारले आणि म्हटलं कि थोड्यावेळानी बिल्डिंग मध्ये जाऊन सगळं सामान गोळा करूच आम्ही थोड्या वेळात. पण आम्हाला खात्री नव्हती कि आत जायला बिल्डिंग राहिल की नाही. गप्पा मारता मारता त्या बाई म्हणाल्या की त्या नुकत्याच फ्लोरिडाच्या विनाशकारी वादळातून सुखरूप बचावल्या होत्या आणि मेक्सिको सिटी मध्ये जरा हवापालट म्हणून आल्या होत्या. त्यांनी त्यांचं सामानही हॉटेल मध्ये ठेवलं नव्हतं आणि हा भूकंपाचा धक्का बसला. बाईंना म्हटलं पुढे कुठे जाणारात ते आधीच आम्हाला सांगून ठेवा. थोड्याश्या हास्यविनोदांनी मानसिक तणाव थोडासा निवळला होता.


रस्त्यावर मिलिटरी, पोलीस, अग्निशमन, ऍम्ब्युलन्स, रेस्क्यू टास्क फोर्स च्या गाड्या फेऱ्या मारायला लागल्या होत्या. रस्त्यावर आम्हाला LPG चा वास येत होता आणि तेवढयात कोणीतरी म्हटलं की आमच्या हॉटेल मध्ये गॅस गळती झालीये आणि अग्निशमन दल त्यावर नियंत्रण आणायचा प्रयत्न करतय. आम्ही आता आपल्या कागदपत्रांची काळजी करायची का आपण सुखरूप बाहेर पडलोय त्यात आनंद मानायचा याचा विचार करत होतो. आईबाबांना बरोबर आणायचा विचार होता पण हे सगळं सहन करून त्यांना न आणायचा निर्णय किती योग्य होता हे समजायला लागलं. आता उन्हं थोडी कलायला लागली होती. संध्याकाळचे ५:३० वाजले होते. 
हॉटेल चा स्टाफ लाऊडस्पीकर वरून स्पॅनिश मध्ये काही सूचना देत होता. नंतर त्याला इंग्लिश मध्ये सांगायची विनंती केली तर त्यांनी चक्क नकार दिला आणि कोणा दुसऱ्याला घेऊन आले पण त्यानी पण नकार दिला. इंग्लिश मध्ये घोषणा करायला शेवटी एकजण तयार झाला अन त्यानी सांगितलं की LPG ची गळती पूर्णपणे आटोक्यात आली आहे आणि थोड्याच वेळात आम्हाला हॉटेल मध्ये सोडण्यात येईल. इंग्लिश मध्ये घोषणा करायचा धाडस दाखवल्याबद्दल, सगळ्या स्टाफनी त्याचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.

भूकंपाला आता ५ तास उलटून गेले होते आणि आम्ही गेले ४-५ तास रस्त्यावर, पार्क मध्ये घरातल्या कपड्यानिशी (मी halfpant , T-shirt वर तर पूनम night ड्रेस मधे)  काढले होते. हॉटेल पडणार नाही याची खात्री झाल्यावर हॉटेलच्या स्टाफनी छोटे छोटे गट बनवून; झाडू, केरभऱ्या, टोपल्या घेऊन आत जायला सुरुवात केली. हॉटेल बाहेर जमलेली लोकं आणि इतर स्टाफ गाणी म्हणून, घोषणा देऊन आत जाण्याऱ्या स्टाफचं मनोबल वाढवत होते. आम्हाला काही स्पॅनिश गाणी येत नव्हती पण टाळ्या वाजवून आम्हीपण त्यात थोडी फार भर घालत होतो. हा स्टाफ ला encourage करायचा experience नी आलेली feelings, गेल्या ४-५ तासाच्या तणावावर पूर्णपणे मात करून गेली आणि एक वेगळाच उत्साह वातावरणात जाणवू लागला. अर्ध्या-पाऊण तासामध्ये आम्हाला आत हॉटेलमध्ये जायची परवानगी मिळाली. आत जाऊन बघतो तर काय; धूळ, काचा सगळं साफ आणि फरश्या परत चकाचक. शेफ्सनी सगळ्यासाठी गरम गरम जेवण (पिझ्झा, स्पगेटी, पोर्क-चिकन करी, डेझर्ट्स) बनवून रेडी ठेवलं होतं. हे सगळं अगदीच अनपेक्षित होतं. व्यवस्थित जेवण करून आम्ही प्रत्येक स्टाफ मेंबर, मॅनेजर्स आणि शेफ्सचे कौतुक करून आभार मानले. (नंतर Google Maps वर हॉटेलच्या review मध्ये पण स्टाफच्या नावानिशी हे नमूद केलं)


१०व्या मजल्यावरची रूम सोडून आम्ही पहिल्या मजल्यावरची रूम घेतली. वरच्या रूम मधून सामान आणायला आम्ही तिघे आणि बरोबर एक गडी होता.  रेवाला कडेवर घेऊन १० मजले चढून जाई पर्यंत पूर्ण दमछाक होईन गेली आमची. रूमचा दरवाजा उघडला तर आत मध्ये सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त आणि जेवण पण सगळं विखरून पडलं होतं.

रूममध्ये आम्हाला अजूनही सगळं हालत असल्याचा भास होत होता आणि कधी एकदा तिथून बाहेर पडतोय असा होत होतं. आम्ही पटापटा bags भरून तिथून लवकर निघालो. मोबाइलवर ऑफिस मधल्यांचे ३०-४० कॉल्स, SMS आले होते. शेवटचा message एका मेक्सिको मधल्या को-वर्कर, केत्झली वर्गीस चा होता ज्याला येऊन ३०-४०mins. झाली होती. "ह्या मेसेज ला जर पुढच्या १५min. मध्ये रिस्पॉन्स नाही आला तर मी तुम्हाला शोधायला बाहेर पडतीये." लागलीच तिला फोन करून कळवलं आणि अर्ध्यारस्त्यातून मागे फिरायला सांगितलं. HR आणि सर्वांना आम्ही जीवानिशी सुखरूप वाचलो असल्याचं कळवलं.

पहिल्या मजल्यावरच्या रूम मध्ये सामान ठेवलं. रूमची अवस्था काही फारशी चांगली नव्हती. कपाटांची दारं उखडली होतो, बेड, सोफ्यावर सगळी माती पडली होती. बाथरूम मध्ये भिंतीवरच्या टाईल्स पडल्या होत्या. भिंतींला, छपराला भेगा पडल्या होत्या. पण त्या रूम मध्ये रात्र काढण्यावाचून आता दुसरा काही पर्याय नव्हता. दुसऱ्यादिवशी सकाळी ८:३० ला US Embassy मध्ये Visa Interview ची अपॉइंटमेंट होती. मनात साशंकता होती की embassy उघडी असेल की तिला काही धोका पोहोचलाय?


भूकंपानंतर २४-७२ तासात aftershocks अपेक्षित असतात. त्यांची तीव्रता कमी असते पण आधीच्या मुख्य धक्क्यामुळे नाजूक झालेल्या बिल्डींग्स भूकंपांतरच्या धक्यांनी (aftershocks) सहज कोसळतात. भूकंपाच्या धक्क्यातून सावरून आता आम्ही ह्या aftershocks ची वाट बघत होतो. लोकं  फूटपाथवर, गाड्यांमध्ये झोपायला आली होती. आम्ही आमच्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरच्या रूम मधल्या एकाच बेडवर रात्र काढायचं ठरवलं. दहाव्या मजल्यावरून मेक्सिको सिटी बघायची हौस आता फिटली होती. बाहेर पाण्याचा एक थेंब जरी पडला तर आम्ही दचकून उठत होतो आणि पळायची वेळ तर नाही ना? असं एकमेकांकडे बघत होतो. दारापाशी एक बॅकपॅक तयार ठेवली होती, मोबाइल, पैसे,क्रेडिट/डेबिट कार्ड्स, पासपोर्ट, महत्वाची कागदपत्रं असं सगळं भरून परत भूकंप जर आला तर ती बॅगपॅक आणि रेवाला घेऊन लगेच पाळायच्या तयारीत होतो. रेवा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून छान शांत झोपून गेली होती. मनात सारखा प्रश्न येत होता, सकाळी भूकंपाच्या वेळेस Emergency अलार्म का वाजला नाही? आता आम्हाला झोप लागलीच आणि परत अलार्म नाही वाजला तर? काही तांत्रिक कारणामुळे भूकंपाच्या सूचनेचा अलार्म वाजला नव्हता म्हणून मग मी एका ग्लास वर एक चमचा अलगद ठेवून एक अलार्म बनवला जेणेकरून आम्ही झोपलोच आणि भूकंप झालाच तर थोडीफार आधी कल्पना यावी आणि पाळायचा निर्णय घेणं सोपा जावं. जीव वाचवून पळायची तयारी तर पूर्ण केली होती आता फक्त वाट पाहायची होती, झोपेची नाहीतर भूकंपांतरच्या धक्यांची... 

पहाटे ४ पर्यंत धक्का जाणवला नाही आणि नंतर कधीतरी निद्रादेवीनी आम्हाला आशीर्वाद दिला. साडेसहाला जाग आली आणि मग उठून पटापट आवरून US Embassy ला interview साठी गेलो. Embassy चालू होती आणि Visa च काम पण लवकर आटोपलं. एकच मेख होती, भूकंपामुळे Embassy नी visa कुरिअर नी पाठवायची सोय बंद केली होती आणि आता आम्हाला ३ दिवसांनी passport घ्यायला परत मेक्सिको सिटीत यायला लागणार होतं. 
हॉटेलवर जाऊन चेकऊट केलं आणि माझ्या workshop  च्या शहराकडे (Queretaro) कडे आम्ही प्रयाण केलं. त्या भयावह ठिकाणाहून सुटलो तर होतो पण ३-४ दिवसांनी परत यायच्या विचारांनीच शहारे येत होते. 

लोकांकडून, इंटरनेट वरून माहिती मिळाली की हा भूकंप ७.१ क्षमतेचा होता आणि इतर भूकंपांप्रमाणे जमीन आडवी (lateral) न हालता वर-खाली(up-down) हालली होती. भूकंपाचा हा प्रकार नवीनच होता. इमारतींच्या पायासाठी (foundation) ही फारच घातक गोष्ट होती. नंतर बाहेर फेरफटका मारला तेंव्हा ह्या गोष्टीची प्रचिती आली, आमच्या शेजारची १४मजली बिल्डिंग भूकंपाने १०इंच वर उचलली गेली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू आम्ही होतो तिथून साधारण २५०km वर Puebla नावाच्या शहरात होता. (जिथे December मध्ये माझा business travel आहे!) एक योगायोगाची गोष्ट घडली होती ती म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे १९सेप्टेंबर पण १९८५ रोजी Mexico सिटी मध्ये विनाशकारी भूकंप आला होता आणि त्यात १०,००० लोकांनी प्राण गमावले होते. त्याहून अचंबित करणारा योगायोग म्हणजे भूकंपाची वेळही सारखीच होती. १९८५च्या भूकंपाची आठवण म्हणून दरवर्षी १९सप्टेंबर ला भूकंप बचावाच्या तयारीची चाचणी घेण्यात येते. तशीच चाचणी १९सप्टें. २०१७ ला पण झाली आणि लागोलाग खरंच भूकंप आला. हा योगायोग होता की पृथ्वीची कुठलीतरी एक साखळी पूर्ण झाली होती?  

मेक्सिको सिटी ही काही शतकांपूर्वी तलावामध्ये भर घालत घालत वसवलेली आहे. शहराच्या खाली अजूनही पाणी आहे आणि भूकंपाच्या धक्यांमुळे जमीन खाली असलेल्या पाण्याच्या, चिखलाच्या तरंगांवर बराच वेळ थरथरते. मेक्सिको सिटीच्या ३००-४००km खोल खाली, मेक्सिको ची प्लेट अमेरिकन प्लेटला धडक देत असल्यामुळे भूकंप होतात. ही प्रक्रिया शेकडोवर्ष चालू आहे. (मला आपली उगाचच ह्या प्रकारची तुलना परप्रातींयांच्या लोंढ्यांशी करावीशी वाटली. मेक्सिको मधील लोक अमेरिकन शहरांना अशीच धडक देत असतात. अमेरिका-मेक्सिको ची बॉर्डर ओलांडता न आल्यास, जमिनीखालून बोगदे खणून कोठल्याही प्रकारे अमेरिकेत यायचा प्रयत्न करतात. दिल्ली, मुंबई, बंगलोर मध्ये जसा परप्रातीयांचा लोंढा येऊन धडकतो तसाच प्रकार मेक्सिकन लोक आणि अमेरिकन शहरांबद्दल घडतो.) आम्ही अनुभवलेला भूकंप हा ४५ सेकंद होता पण आम्हाला तो ४५ मिनीटांसारखा भासला. जणूकाही काळ त्या ४५ सेकंदामध्ये थिजून गेला होता. 





ठरल्याप्रमाणे ३ दिवसांनी आम्ही मेक्सिको सिटी मध्ये परत येऊन आमचा पासपोर्ट घेतला आणि थरथरत्या मनानी आणि शब्दशः थरथरत्या शरीराने हॉटेलच्या वास्तूचे आभार मानले. मेक्सिको च्या सर्व नागरिकांना नवनिर्माणाची शक्ती मिळो अशी प्रार्थना करत, मेक्सिको सिटी बघायला परत कधीतरी येऊच अशी खूणगाठ बांधत, आम्ही आमच्या Detroit च्या विमानात बसलो
Adios Mexico! See you again in December in Puebla!

Detroit airport वरून टॅक्सिने घरी येताना मनामध्ये विचार चमकून गेला, मेक्सिकोला जाताना टॅक्सी अजून उशिरा आली असती, आम्ही चुकीच्या टर्मिनल वर अडकून पडलो असतो, आम्ही फ्लाईट वेळेत पकडू शकलो नसतो तर?  कुठलीतरी अज्ञात शक्ती आम्हाला मेक्सिकोला १९सप्टेंबरला जाता येऊ नये ह्याचा आटोकाट प्रयत्न करित होती का? 

गणपती आणि बॅक्टेरिया

सार्वजनिक गणेशविसर्जन करताना-केल्यावर मूर्तींची होणारी हेळसांड बघून मन विषण्ण झाल्यावर मी डोळे मिटून घेतले होते. अजून काही प्रश्नमाश्या घों...