ABCD to अबकड via Canton शाळा
२०२०-२१ मधे सांगून गेला करोना, प्रत्यक्ष भेटीगाठी टाळा,
तरी चालू राहिली online, Canton मराठी शाळा.
अबकड आणि उत्सव कशातच नाही पडून दिला खंड,
Lockdown असो वा schools बंद, वाहत राहिला मराठीचा प्रवाह अखंड.
२०२० मध्ये करोना महामारी हातपाय पसरायला लागल्यापासून आपला प्रवास भीती ते back to सोवळं-ओवळंच्या चालीरिती असा चालू होता आणि आहे. २०२०-२१ आपल्याला व्यावसायिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत पातळीवर खूपच आव्हानात्मक गेलं. Lockdown आणि भेटणाच्या बंधनांमुळे, आठवड्यातून एकदा ‘हिंदू टेम्पल, कँटन’ मध्ये भेटणारे आम्ही; आता भेटणार तरी कसं आणि जर मुलांच्या मराठी शिकण्यामध्ये खंड पडला तर ती मराठी पासून दुरावण्याची भीती होती. आपल्या ABCD(American Born Confused Desi) मुलांचं मराठी ‘learning’ कसं चालू राहणार ह्याची चिंता सतावत होती.
व्यक्तिगत, कौटुंबिक आव्हानं यशस्वीरीत्या पार करत, आम्ही कँटन शाळेच्या शिक्षकांनी e-learning चालू करायचं ठरवलं. मराठी शाळेसाठी e-learning प्रकरण सर्वांनाच नवीन असल्यामुळे वर्ग कसा घ्यायचा, ऑनलाइन कसं शिकवायचं, लेखन कसं करून घ्यायचं असे एक न दोन नुसते प्रश्नच सर्वांसमोर होते. Google गुरुजींची मदत घेत घेत मग आम्हीच ‘Google Classroom’ बनवल्या आणि Feb-Mar२०२० च्या lockdownच्या धक्क्यातून सावरत सावरत April २०२० मध्ये पहिली-वहिली ‘online शाळा’ चालू झाली पण.
पुढे आम्हाला महाराष्ट्र मंडळ, डेट्रॉईट ची चांगली साथ लाभली आणि मंडळानी विकत घेतलेल्या गूगल सेवांमुळे classrooms, breakout rooms बनवून वेगवेगळ्या वयोगटाचे वर्ग घ्यायला सुलभता आली. आता वेगवेगळे वर्ग चालू तर झाले होते पण आम्हा शिक्षकांना एक प्रश्न भेडसावत होता, ५-७-९ वयाच्या मुलांना तासभर लॅपटॉपच्या स्क्रीन समोर खिळवून ठेवायचं कसं आणि तेवढया वेळेत मराठीचं बाळकडू पाजायचं कसं? आपण काय Peppa pig नाही की Blippi नाही, जे ते आपल्याला तासन् तास बघत, ऐकत बसतील. विचारमंथन करून शेवटी असं ठरलं की Crafts, ऑनलाइन videos, मराठी e-books ह्यांची जास्तीत जास्त मदत घ्यायची आणि जसं जसं ऑनलाइन शोध घेत गेलो तश्या तश्या गूगलबाबाच्या एक एक गुहा उघडत गेल्या.
Interactive sites, Multimedia ह्याचा वापर करत आम्ही मुलांना रविवारच्या मराठी वर्गांमध्ये गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालो होतो. गाणी-गोष्टी, गप्पा, crafts करत करत मुलं त्यांच्या नकळत लॅपटॉपचं, माऊसचं बोट धरून (का त्यावर बोट ठेवून?) मराठी भाषा, संस्कृती आत्मसात करत होती. ह्यामध्ये मुलांच्या पालकांचा पण मोठा वाटा होता. पालकच आमचे खरे class monitors होते आणि online assignments submit करून आम्हा शिक्षकांना lockdown असताना पण मुलांची प्रगती तपासायची संधी देत होते.
दसऱ्याला मुलांनी रावणदहनाची ऑनलाइन गोष्ट ऐकत ऐकत बाहुल्या बनवल्या, होळीची रंगीबेरंगी भेटकार्ड बनवली.
Halloweenला मुलं भोपळ्यामध्ये candle लावण्याबरोबरच शाळेच्या मावशीकडून दिवाळीचा आकाशकंदील पण शिकत होती आणि सगळ्या मराठी मित्र-मैत्रिणींबरोबर e-फराळ करत, धमाल करत आम्हाला करोना महामारी विसरायला भाग पाडत होती.
किल्ला काय प्रकरण असतं आणि शिवाजीमहाराज त्याचा वापर बलाढ्य अशा मुघल-आदिलशाह विरुद्ध खुबीने कसा करायचे ह्याचे powerpoint presentation डेट्रॉईट मध्ये बसून बघता बघता मूले सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यात पोहचत होती आणि भगवा फडकताना बघत होती.
२०२० सरलं आणि वाटलं चला हे ‘करोना का रोना’ आता तरी संपेल पण २०२१ मध्ये पण मागच्या पानावरून कहाणी पुढच्यापानावर सुरूच होती. एव्हाना विद्यार्थी, शिक्षक आणि पालक पण ऑनलाइन शाळेला चांगलेच सरावले होते आणि ऑनलाइन शाळा पाहिल्यांदिच करत होते हे कोणाला सांगून पण खरं वाटणार नाही अश्या तऱ्हेने सफाईदारपणे आपापल्या भूमिका निभावत होते. महामारीमुळे जश्या लोकांच्या भेटीगाठीच्या संकल्पना बदलल्या त्याला अनुसरून २०२१च्या प्रत्यक्ष सभागृहात होणाऱ्या गणेशोत्सवाची तयारीही आता Google Meet वर जोरदारपणे चालू होती. गणेशोत्सवात सादर केलेलं ‘किती वेळा सांगितलंय हो बाप्पा तुम्हाला, रोज गोड खाऊ नका जपा जीवाला’ गाणं सगळ्यांचीच दाद मिळवून गेलं.
२०२१-२२ शाळेचं वर्ष आता परत प्रत्यक्ष हिंदू टेम्पलमध्ये भेटून चालू झालंय आणि सगळ्या चिमुकल्यांच्या डोळ्यात एकच आत्मविश्वास दिसतोय की इकडचं जग तिकडे जरी झालं तरी आमच्या व मराठी शिकण्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. आम्हा शिक्षकांना एवढंच समाधान होतं की महामारीमधेसुद्धा आपल्या ABCD मुलांचा ‘अबकड’चा प्रवास via Canton मराठी शाळा चालूच राहिला...
अभिजित जोगदेव
विशेष आभार :
कँटन शिक्षक - सौ. स्मिता अत्रे, सौ. भावना नलावडे, सौ. सुरेखा पाटील, सौ. गिरिजा देवधर
महाराष्ट्र मंडळ डेट्रॉईट समन्वयक: श्री. दीपक कुलकर्णी, सौ. दीपा इंगळे
