पुन्हा एकदा दिवाळी…
ओळीत मांडून पणत्या, रचून दिव्यांची आरास
लखलखाट घरोघरी, उन्मेषाचे कारण आहे तसे खास
घनघोर रणकंदन घडले दूर देशी असुर सेनेचे,
रामराया परतले होते आज, पतन करून दशाननाचे
चौदा वर्षाचा वनवास घडला कैकेयीच्या हक्कासाठी,
कांचनमृगा मागे धावले श्रीराम जानकीच्या हट्टापायी.
समुद्रापार लंकेस घेवोनि गेला सीतामाईस क्रूरकर्मा,
त्रेतायुगातील पापाचा घडा भरू लागला होता त्याचा आता.
घेऊन सोबतीला जांबुवंत आणि महावीर हनुमंत,
“जय श्रीराम” म्हणताच चढे स्फुलिंग, अन दुमदुमे आसमंत.
सागरसेतू बांधून तरंगता, वानरसेना घुसली लंकेत आरपार,
सोडवून आणलेच प्राणप्रियेस, जाऊन थेट समुद्रापार.
सुखद वाटे आता तो संघर्ष, ती पर्णकुटी अन वनवास,
असह्य होत होता कबरी खालचा विजनवास
घनघोर रणकंदन घडले ह्याच देशी पुन्हा एकदा,
माझा रामलल्ला परतला, त्याच्या घरी पुन्हा एकदा.
ओळीत मांडून पणत्या, रचून दिव्यांची आरास
लखलखाट घरोघरी, उन्मेषाचे कारणच तसे आहे
पुन्हा एकदा खास…
-अभिजीत जोगदेव
( २०२४ ची दिवाळी खास आहे. अयोध्येतील राम मंदिर पुनर्निर्माण पूर्ण झाले आहे आणि रामलल्ला त्यांच्या जन्मभूमीत दिमाखदारपणे पुन्हा एकदा परतले आहेत…पुन्हा एकदा दिवाळी!)
