(MaayMarathi-WhyMarathi-MyMarathi)
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन,
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन ।
नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव,
राहो चित्ती प्रिय मम परि जन्मभूमी सदैव ।।
शाळेत असताना कुमारभारती पुस्तकात शिकलेली वासुदेवशास्त्री खऱ्यांची कविता कधी जीवनगाणं होऊन गेली हे कळलंच नाही आणि ह्या प्रवासात मराठीसाठी काही करायची प्रेरणा कशी मिळाली ते शब्दात मांडण्याचा हा एक प्रयत्न. वासुदेव शास्त्रींनी म्हटल्याप्रमाणे कामानिमित्त भारत, जर्मनी, चीन अशा देशात भटकून आता अमेरिकेमध्ये स्वत:चं सदन करून स्थिरस्थावर झालोय खरा पण सातासमुद्रापार अनोळखी व्यक्ती, अपरिचित संस्कृतीच्या घोर रानात चहूबाजूंनी इंग्रजी-स्पॅनिशचं वादळ घोंघावत असताना मायमराठीचं रोपटं जपायची आणि पुढच्या पिढीत रुजवायची जाणीव कशी, कधी आणि का प्रबळ होत गेली त्याचा हा धांडोळा.
२०१५ मध्ये डेट्रॉईट मिशीगनला international assignment वर expat म्हणून आलो आणि २-३ वर्षात भारतात परतायचं असं ठरवून संसाराचा एक छोटासाच तात्पुरता संच इथे उभा केला. पहिल्या मुलीचा इथला जन्म, नवीन काम, ऑफिस ह्यामध्ये रुजता रुजता २-३ वर्ष सरली पण तरी अजून इथल्या चाली रीती-भाती, मूल्य ह्यांची पूर्ण ओळख होत होती. भारतातल्या ब्रिटिशोद्भव इंग्रजीची तर इथे अमेरिकन इंग्लिशमुळे दिवसाढवळ्या धिंड निघत होती. चेकला बिल, बिलाला चेक, सायकलला बाईक, बाईकला मोटरसायकल अशी भंबेरी कमी म्हणून दिव्याचं switch वर केलं की बंद आणि खाली केलं की चालू असल्या प्रकारांनी आमचे फ्यूज पार उडून गेले होते (अजूनही मी switch बरोबर उलटंच दाबतो). एव्हाना २ वर्षाच्या झालेल्या माझ्या मुलीची ABCD मध्ये म्हणजे अमेरिका बॉर्न कन्फ्युज्ड देसींमध्ये भर पडली होती. घरात मराठी, बायको गुजराथी असल्यामुळे तिचा-सासरकडच्यांचा मुलीशी संवाद गुजराथीतून आणि मुलीच्या शाळेत, शेजारपाजाऱ्यांशी इंग्रजी-स्पॅनिश संवाद, त्यामुळे तिनी तिची अशी एक वैश्विक भाषा निर्माण केली होती. तर अशा ह्या भेळ-मिसळ केंद्राची अजून भरभराट व्हायच्या आत आमचा इथून गाशा गुंडाळायचा प्लॅन होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
इथल्या कंपनीनी, फक्त expat म्हणून काम न करता त्यांच्याच बरोबर काम करायची ऑफर दिली आणि L1-A व्हिसा असल्यामुळे एखाद वर्षात ग्रीनकार्ड करून द्यायची तयारीपण दर्शवली. करियरच्या दृष्टीने आलेल्या उत्तम संधीचं सोनं करण्यासाठी घरातल्या साठी-सत्तरीकडे झुकणाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आणि बायकोची इथे संसार-करिअर करायची तयारी ह्यांनी निम्मा प्रश्न सहज सुटला पण इथल्या भिन्न भाषा-संस्कृतीमध्ये काका-मावशी, आजीआजोबांपासून दूर, मुलांना वाढवायची धाकधूक वाटत होती. आपले आप्त-मित्र, आपलं सगळं social circle भारतात सोडून असं अचानक दुसऱ्या संस्कृतीत सामावून जाणं जरा आव्हानात्मक वाटत होतं. ‘Here’ or ‘To-Go’च द्वंद्व चालू असताना आत कुठेतरी जाणीव व्हायला लागली होती की जरी आपण इथल्या संस्कृती-मूल्यांना आत्मसात करायचा प्रयत्न करत असलो तरी आपल्या मुलांच्या ओंजळीत आपली मूळ भाषा-संस्कृतीमूल्ये द्यायची जबाबदारी पण आपलीच आहे.
सरतेशेवटी, आयुष्याच्या तिशीत पडलेल्या या ‘American Dream’ ला वास्तवात उतरवायचं ठरवलं आणि त्याचबरोबर इकडे दूरदेशी, मराठीची सेवा करायची आलेली संधी आणि आव्हान स्वीकारायचे मनोमन ठरवले. इथे समाजात वावरताना नजरेस जाणवणारी मराठीची अनुपस्थिती, दुकाने-बाजारपेठांत कधीच न दिसणारे मराठी फलक, आम्ही स्विकारलेल्या आव्हानाचे कायम स्मरण करून देत असतात. कुठेही खरेदी करायला, किंवा फिरायला पार्क मध्ये गेलं आणि कानावर मराठी पडलं तर आपसुकच ओळख करून घ्यायला धडपड करायचो, अजूनही करतो. त्यातूनच ओळखी होतहोत, मराठीजनांच्या भेटीगाठी नंतर काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या त्या पुढील प्रमाणे-
१. दहा-बारा वर्षाची मुले, ज्यांनी मराठीचं विशेष शिक्षण घेतलं नाहीये ती भारतातील आजी-आजोबा आणि नातेवाईकांशी “कसे आहात?/ काय करताय?” ह्याच्या पलिकडे मराठीतून संवादच साधू शकत नाहीयेत आणि सगळेच आजी-आजोबा, नातेवाईक मुलांशी इंग्रजीमधून संवाद साधू शकत नसल्यामुळे, नात्यामध्ये जो अपेक्षित ओलावा, बंध पाहिजे तो निर्माणच होऊ शकत नाहीये.
२. ज्यांची मुले वयवर्षे १० आणि त्या पुढील आहेत अशा बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृतीची ओळख, आवड नसल्याची खंत आहे आणि मुलांनी मराठी शिकावं अशी मनापासून इच्छा आहे.
३. असेही काहीजण भेटले जे म्हणाले की कशाला शिकायचं मराठी इथे राहून? काय उपयोग होणारे मुलांना त्याचा त्यांच्या करियर मध्ये? त्यापेक्षा आम्ही स्पॅनिश, फ्रेंच भाषा शिकवतो/ मुले शिकतीलच शाळेत ते. ह्या मुद्द्यानी जरा काही काळ भ्रमित व्हायला झालं पण ओळखीच्यातल्या मुलांची नातेवाकांशी भाषेमुळे तुटलेली संभाषणं, नाती बघून भानावर आलो.
४. बहुतांशी पालकांना मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण करायची इच्छा तर आहे पण योग्य माध्यम, संधी आणि सातत्यपूर्ण परिश्रम ह्याची कमतरता आहे.
५. कामाच्या स्वरूपामुळे/ व्हिसाच्या मर्यादेमुळे पालकांना भारतात परतावे लागू शकते त्यामुळे परतल्यावर सामाजिक,व्यावहारिक त्रुटी मुलांना भासू नये म्हणून पण मुलांना मराठीचा सराव ठेवण्यासाठी पालकांची धडपड आहे.
६. मुले किंडरगार्टेन मध्ये जाई पर्यंत घरात मराठीतून संभाषण होतंय पण त्यानंतर पहिली-दुसरीमधील मुले इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे आणि घरातली मराठीची शिकवणी मागे पडल्यामुळे इंग्रजीतूनच प्रतिसाद देत आहेत आणि मुले एकदा का १०-१२वर्षाची झाली किंवा Middle school मध्ये गेली की शाळा, projects, extra-curricular activitiesच्या व्यापामुळे मराठी शिक्षणाला दुय्यम स्थान मिळत आहे आणि सरावातील सातत्य राहत नाहीये. बहुतेक पालकपण मुलांकडे मग “You must talk to me in Marathi, हं” असा लडिवाळ हट्ट धरातायेत पण फक्त अशानी मराठीचा पैलतीर सोडलेलं ते गलबत कसं किनाऱ्यावर परतणार?
ह्या सर्व अनुभवांच्या चिंतनातून मनोमन खात्री पटली की मुलांचा ६-७ वय वर्षापर्यंतचा काळ, मराठी मध्ये रुची यायला, सराव करायला सर्वोत्तम आहे. मुलांना त्या वयात एकदा रुची निर्माण झाली की मग मुले १०-१२वर्षाची होईपर्यंत अत्यंत सफाईदारपणे मराठी बोलू, लिहू शकतात.संभाषण करू शकतात. घरातल्या घरात मराठी सराव करण्यापेक्षा इतर मुलांबरोबर मिळून नियमित मराठी शिकण्याची सोय असल्यास हा अभ्यास सुखकारक याची जाणीव झाली.
इथल्या मराठीच्या शोधामध्ये डेट्रॉईटच्या महाराष्ट्र मंडळाच्या साप्ताहिक मराठी शाळेबद्दल माहिती मिळाली. १२-१५ पटसंख्या आणि २-३ शिक्षक असा मराठीच्या उत्साही शिलेदारांचा दर रविवारी भरणारा सोहळा खूपच कौतुकास्पद वाटला. मराठीची सेवा करायची, आपल्या पुढच्या पिढीला मराठीशी जोडायची याहून चांगली संधी आणि चांगले व्यासपीठ मिळणार नाही याची खात्री पटली आणि २०१८ ला मीही डेट्रॉईटच्या दक्षिणेकडील, Canton शहरातील शाळेत स्वयंसेवक म्हणून रुजू झालो.
एव्हाना दुसऱ्या मुलीचा पण जन्म झाला होता. आपल्या मूळ भाषेची गोडी लावायची जबाबदारी फक्त कुटूंबापुरती मर्यादित न राहता, आई-वडिलांच्या आग्रहास्तव शाळेत येणाऱ्या, मराठीला “मरॉटी” म्हणणाऱ्या अजून १२-१५ मुलांची पण जबाबदारी घेतली होती. महाराष्ट्रात शिकत असताना इंग्रजी ही ‘वाघिणीचे दूध’ वाटायची पण इथे इंग्रजांच्याच देशात वाढणाऱ्या मुलांना मराठी शिकवत असताना मराठीच खरी ‘Tiger’s milk’ आहे ह्याची प्रचिती यायला लागली. ‘ई’ ईडलिंबूचा पेक्षा, ‘ई’ e-mail चा, ‘उ’ उखळीचा पेक्षा ‘उ’ UNO चा अशी उलटी गंगा वाहवावी लागली. In this country of Plenty, ‘अति तिथे माती’ चा अर्थ समजावून सांगताना दमछाक होत होती. या Gen-Alphaच्या कलेकलेने घेत आता आमचा ABCD ते अबकड चा साप्ताहिक प्रवास चालू झाला होता.
२०१९-२० मध्ये करोनाच्या थैमानामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य नव्हत्या पण Google Classroom च्या माध्यमातून आम्ही मराठीशी नाळ कायम जोडलेली ठेवली. मराठी भाषा-परंपरांना साजेसे शाळेतील उपक्रम, गणेशोत्सवात शाळेतील मुलांनी सादर केलेले मराठीशी नातं सांगणारे उत्तमोत्तम कार्यक्रम यांनी शाळेची माहिती लोकांमध्ये पोचली आणि २०२४-२५ येईपर्यंत Canton शाळेची विद्यार्थीसंख्या १२-१५ वरून पार ७५च्या पलीकडे गेली. बहुतांशी पालकांना भासणारी मराठी शिक्षणाची उणीव आणि त्यातून मराठी शाळेला मिळणारा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आम्ही अजून एक शाखा उघडली. इथल्या मातीशी-हवामानाशी जवळीक ठेवून, भारतीय-मराठी परंपरा सण, इतिहास याच्याशी पण दुवा साधत BMM-भारती विद्यापीठाने रचलेला अभ्यासक्रम हा या सर्वाचा भरभक्कम पाया आहे. तसेच महाराष्ट्र मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांना मिळणाऱ्या संधी, त्यांच्याच वयाच्या आणि त्यांच्याच सारखे इंग्रजाळलेले मराठी बोलणाऱ्या मुलांबरोबर वावरायच्या संधी, मराठीची उणीव काही प्रमाणात नक्कीच भरून काढतात. मुलांच्या careerच्या दृष्टीने विचार करता, २०१९ पासून मिशीगन राज्याने मराठीला ‘परकीय भाषेचा’ दर्जा दिल्यामुळे, विद्यार्थी मराठी शिकून-योग्य परिक्षा देऊन Highschool मध्ये २ credits सहज मिळवू शकतात.
अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारुन आता इथेच स्थायिक झाल्यावर, Gen-alpha च्या ओंजळीत मराठीचा काहीतरी मेवा ठेवायची संधी मिळाल्याची भावना खूपच सुखद आहे. स्वत:च्या दोन्ही मुली आणि साप्ताहिक शाळेमधील इतर मुलांना घरी, भारतातील आजी-आजोबांबरोबर, नातेवाईकांबरोबर मराठीतून गप्पागोष्टी करताना, हसताना खिदळताना बघून खूपच छान वाटतं. मुलींना घेऊन पुण्यात एका लग्नसमारंभात गेलेलो असताना एका आजींबरोबर दोन्ही मुलींनी इतक्या छान गप्पा मारल्या की आजी नंतर मुलींच्या मराठीचं कौतुक करताना रडल्या, म्हणाल्या मुलींच्या मराठीच्या वापरावरून मुली अमेरिकेत वाढतायेत असं वाटतच नाहीये, माझ्या सख्या नातींनी पण जर माझ्याशी अशा गप्पा मारल्या असत्या तर आयुष्याच्या शेवटी काही खंत राहिली नसती… आजींची अशी पावती मनाला चटका लावून गेली आणि सातासमुद्रापार आपण घेत असलेल्या मराठीच्या परिश्रमाचं चीज झाल्याचं समाधान वाटलं.
एवढ्यावरच सुखावून जाऊन इथेच न थांबता मराठी शाळेच्या माध्यमातर्फे मराठीची सेवा करत राहायची मनोमन इच्छा आहे. नुकताच ऑक्टोबर २०२४ मध्ये मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्रदान झाला आहे, तेंव्हा तिचा अभिजातपणा, classical status जपायची जबाबदारी इथे सातासमुद्रापार आपल्या सर्वांवर पण आहे. इथे लहानाचे मोठे होणाऱ्यांनी आपल्या मायबोली मायमराठीला, “My Marathi” म्हणून मिरवलं की अभिजात भाषेचा दर्जा पुनःश्च सिद्ध करायची गरज पडायची नाही. इथल्या समाजात वावरताना आपल्या मराठी भाषेचे-संस्कृतीचे अदृश्य धागे गुंफून जो कोष बनवतोय, त्यातून पुढे जाऊन मराठीत संवाद साधू शकतील अशी सुंदर फुलपाखरं बहरतील अशी खात्री आहे.
America Born Confused Desi म्हणजेच ABCD मुलांना मराठीच ‘गमभन’चं भान आलं, श्लोक, प्रार्थना, कविता-साहित्य यातलं थोडंफार समाजलं, उत्तम चित्रपट-नाटक कलाकृती समजल्या तसेच आपले सण, भारत-महाराष्ट्राबद्दल समजले, आजीआजोबांशी, बहिणभावंडांशी मराठीत गप्पा मारता आल्या आणि पुणेरी पाट्यांमधला खोचक पण थेट अर्थ कळून हसू आलं की माझी मोहिम फत्ते! मग इथे अमेरिकेत मराठी कशासाठी? ह्या प्रश्नाची उकल पावलोपावली होईल पण त्यासाठी फक्त इच्छा नाही तर मुलांबरोबर १०-१२ वर्षाची तपश्चर्या लागेल. A for “Apple” जसं यायला पाहिजे तसेच A for “Aapli मराठी” ह्याची पण आठवण राहिलीच पाहिजे.
- अभिजित जोगदेव | कँटन, डेट्रॉईट मिशीगन | मराठी शाळा मुख्याधापक आणि BMM समन्वयक
abhijog24@gmail.com | +1 248.778.8318
(फेब्रुवारी २०, २०२५)