संक्रांत
जानेवारीची कूडकूड थंडी बघत असते अंत,
पण तेवढ्यात येते उबदार, गोडगोड संक्रांत.
आोंझळभर काटेरी हलवा त्यात तिळाची वडी
भाकरी-भोगीची भाजी, अन आईची ती काळी साडी
हरभर्याचे घाटे, पॅापिन्सच्या गोळ्या, बोरं आणि आवळे
अजुनही आठवतात ते बोरनहाणाचे सोहळे…
बालगोपाळांच्या गराड्यात केलेली लाह्या-बत्ताश्यांची लूट,
पतंगाच्या मांज्याला लावायला केलेला काचेचा कूट.
भाजलेले तीळ नाहीतर खमंग गुळपोळीचा येता वास,
ताज्या होतात संक्रांतीच्या आठवणी खास…
अशा किंवा याहून रंगतदार आठवणी आपल्या मुलांना इकडे सातासमुद्रापार पण देता आल्या तर?
ह्या विचारातून सुरुवात झाली आमचा कँटन मराठी शाळेच्या संक्रांत २०२२ चा तयारीला.
२३ जानेवारीला सगळी मुलं काळे कपडे घालून शाळेत जमली होती. कार्यक्रमाची सुरूवात सूर्यनारायणाला नमन करून मुलांना संक्रांतीची वैदयानिक, खगोलीय माहितीने केली. मकर राशी, हिवाळा आणि संक्रांत याचा काय संबंध आहे आणि आपल्या पूर्वजांनी थंडीतल्या आवश्यक आहाराची संक्रांतीच्या सणामधे कशी उत्तम सांगड घातली हे एका छोट्याखानी powerpoint presentation मधून मुलांनी जाणून घेतलं. [संक्रांत -Canton Marathi shala]
त्यानंतर मुलांनी सुगीची माहिती घेत, भाज्यांची मराठी नावं शिकत-शिकत पारंपरिक सुगड पूजनसुद्धा केले. सुगड म्हणून cauldron pot चा वापर संस्कृतींची सहज सांगड घालून गेला. हरभरे, उसाचे करवे, वेगवेगळ्या भाज्यांची जुळवाजुळव, पालकांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वयंसेवेमुळे सहज शक्य झाली. हळदी कुंकू, हलवा- तीळवड्या आणि लाडू एकमेकांना देत, ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ अशा शुभेच्छयांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment