Billori
Billori- A colored glass. Once light passes through it, light gains different perspectives, colors and dimensions. As I go through life experiences, I am trying to reflect, refract through those moments, experiences. Hope you will like to read my take and may corelate to yours as well.
Monday, September 8, 2025
गणपती आणि बॅक्टेरिया
Wednesday, February 19, 2025
कशासाठी पोटासाठी, पण अमेरिकेत मराठी कशासाठी?
(MaayMarathi-WhyMarathi-MyMarathi)
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन,
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन ।
नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव,
राहो चित्ती प्रिय मम परि जन्मभूमी सदैव ।।
शाळेत असताना कुमारभारती पुस्तकात शिकलेली वासुदेवशास्त्री खऱ्यांची कविता कधी जीवनगाणं होऊन गेली हे कळलंच नाही आणि ह्या प्रवासात मराठीसाठी काही करायची प्रेरणा कशी मिळाली ते शब्दात मांडण्याचा हा एक प्रयत्न. वासुदेव शास्त्रींनी म्हटल्याप्रमाणे कामानिमित्त भारत, जर्मनी, चीन अशा देशात भटकून आता अमेरिकेमध्ये स्वत:चं सदन करून स्थिरस्थावर झालोय खरा पण सातासमुद्रापार अनोळखी व्यक्ती, अपरिचित संस्कृतीच्या घोर रानात चहूबाजूंनी इंग्रजी-स्पॅनिशचं वादळ घोंघावत असताना मायमराठीचं रोपटं जपायची आणि पुढच्या पिढीत रुजवायची जाणीव कशी, कधी आणि का प्रबळ होत गेली त्याचा हा धांडोळा.
२०१५ मध्ये डेट्रॉईट मिशीगनला international assignment वर expat म्हणून आलो आणि २-३ वर्षात भारतात परतायचं असं ठरवून संसाराचा एक छोटासाच तात्पुरता संच इथे उभा केला. पहिल्या मुलीचा इथला जन्म, नवीन काम, ऑफिस ह्यामध्ये रुजता रुजता २-३ वर्ष सरली पण तरी अजून इथल्या चाली रीती-भाती, मूल्य ह्यांची पूर्ण ओळख होत होती. भारतातल्या ब्रिटिशोद्भव इंग्रजीची तर इथे अमेरिकन इंग्लिशमुळे दिवसाढवळ्या धिंड निघत होती. चेकला बिल, बिलाला चेक, सायकलला बाईक, बाईकला मोटरसायकल अशी भंबेरी कमी म्हणून दिव्याचं switch वर केलं की बंद आणि खाली केलं की चालू असल्या प्रकारांनी आमचे फ्यूज पार उडून गेले होते (अजूनही मी switch बरोबर उलटंच दाबतो). एव्हाना २ वर्षाच्या झालेल्या माझ्या मुलीची ABCD मध्ये म्हणजे अमेरिका बॉर्न कन्फ्युज्ड देसींमध्ये भर पडली होती. घरात मराठी, बायको गुजराथी असल्यामुळे तिचा-सासरकडच्यांचा मुलीशी संवाद गुजराथीतून आणि मुलीच्या शाळेत, शेजारपाजाऱ्यांशी इंग्रजी-स्पॅनिश संवाद, त्यामुळे तिनी तिची अशी एक वैश्विक भाषा निर्माण केली होती. तर अशा ह्या भेळ-मिसळ केंद्राची अजून भरभराट व्हायच्या आत आमचा इथून गाशा गुंडाळायचा प्लॅन होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
इथल्या कंपनीनी, फक्त expat म्हणून काम न करता त्यांच्याच बरोबर काम करायची ऑफर दिली आणि L1-A व्हिसा असल्यामुळे एखाद वर्षात ग्रीनकार्ड करून द्यायची तयारीपण दर्शवली. करियरच्या दृष्टीने आलेल्या उत्तम संधीचं सोनं करण्यासाठी घरातल्या साठी-सत्तरीकडे झुकणाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आणि बायकोची इथे संसार-करिअर करायची तयारी ह्यांनी निम्मा प्रश्न सहज सुटला पण इथल्या भिन्न भाषा-संस्कृतीमध्ये काका-मावशी, आजीआजोबांपासून दूर, मुलांना वाढवायची धाकधूक वाटत होती. आपले आप्त-मित्र, आपलं सगळं social circle भारतात सोडून असं अचानक दुसऱ्या संस्कृतीत सामावून जाणं जरा आव्हानात्मक वाटत होतं. ‘Here’ or ‘To-Go’च द्वंद्व चालू असताना आत कुठेतरी जाणीव व्हायला लागली होती की जरी आपण इथल्या संस्कृती-मूल्यांना आत्मसात करायचा प्रयत्न करत असलो तरी आपल्या मुलांच्या ओंजळीत आपली मूळ भाषा-संस्कृतीमूल्ये द्यायची जबाबदारी पण आपलीच आहे.
सरतेशेवटी, आयुष्याच्या तिशीत पडलेल्या या ‘American Dream’ ला वास्तवात उतरवायचं ठरवलं आणि त्याचबरोबर इकडे दूरदेशी, मराठीची सेवा करायची आलेली संधी आणि आव्हान स्वीकारायचे मनोमन ठरवले. इथे समाजात वावरताना नजरेस जाणवणारी मराठीची अनुपस्थिती, दुकाने-बाजारपेठांत कधीच न दिसणारे मराठी फलक, आम्ही स्विकारलेल्या आव्हानाचे कायम स्मरण करून देत असतात. कुठेही खरेदी करायला, किंवा फिरायला पार्क मध्ये गेलं आणि कानावर मराठी पडलं तर आपसुकच ओळख करून घ्यायला धडपड करायचो, अजूनही करतो. त्यातूनच ओळखी होतहोत, मराठीजनांच्या भेटीगाठी नंतर काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या त्या पुढील प्रमाणे-
१. दहा-बारा वर्षाची मुले, ज्यांनी मराठीचं विशेष शिक्षण घेतलं नाहीये ती भारतातील आजी-आजोबा आणि नातेवाईकांशी “कसे आहात?/ काय करताय?” ह्याच्या पलिकडे मराठीतून संवादच साधू शकत नाहीयेत आणि सगळेच आजी-आजोबा, नातेवाईक मुलांशी इंग्रजीमधून संवाद साधू शकत नसल्यामुळे, नात्यामध्ये जो अपेक्षित ओलावा, बंध पाहिजे तो निर्माणच होऊ शकत नाहीये.
२. ज्यांची मुले वयवर्षे १० आणि त्या पुढील आहेत अशा बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृतीची ओळख, आवड नसल्याची खंत आहे आणि मुलांनी मराठी शिकावं अशी मनापासून इच्छा आहे.
३. असेही काहीजण भेटले जे म्हणाले की कशाला शिकायचं मराठी इथे राहून? काय उपयोग होणारे मुलांना त्याचा त्यांच्या करियर मध्ये? त्यापेक्षा आम्ही स्पॅनिश, फ्रेंच भाषा शिकवतो/ मुले शिकतीलच शाळेत ते. ह्या मुद्द्यानी जरा काही काळ भ्रमित व्हायला झालं पण ओळखीच्यातल्या मुलांची नातेवाकांशी भाषेमुळे तुटलेली संभाषणं, नाती बघून भानावर आलो.
४. बहुतांशी पालकांना मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण करायची इच्छा तर आहे पण योग्य माध्यम, संधी आणि सातत्यपूर्ण परिश्रम ह्याची कमतरता आहे.
५. कामाच्या स्वरूपामुळे/ व्हिसाच्या मर्यादेमुळे पालकांना भारतात परतावे लागू शकते त्यामुळे परतल्यावर सामाजिक,व्यावहारिक त्रुटी मुलांना भासू नये म्हणून पण मुलांना मराठीचा सराव ठेवण्यासाठी पालकांची धडपड आहे.
६. मुले किंडरगार्टेन मध्ये जाई पर्यंत घरात मराठीतून संभाषण होतंय पण त्यानंतर पहिली-दुसरीमधील मुले इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे आणि घरातली मराठीची शिकवणी मागे पडल्यामुळे इंग्रजीतूनच प्रतिसाद देत आहेत आणि मुले एकदा का १०-१२वर्षाची झाली किंवा Middle school मध्ये गेली की शाळा, projects, extra-curricular activitiesच्या व्यापामुळे मराठी शिक्षणाला दुय्यम स्थान मिळत आहे आणि सरावातील सातत्य राहत नाहीये. बहुतेक पालकपण मुलांकडे मग “You must talk to me in Marathi, हं” असा लडिवाळ हट्ट धरातायेत पण फक्त अशानी मराठीचा पैलतीर सोडलेलं ते गलबत कसं किनाऱ्यावर परतणार?
ह्या सर्व अनुभवांच्या चिंतनातून मनोमन खात्री पटली की मुलांचा ६-७ वय वर्षापर्यंतचा काळ, मराठी मध्ये रुची यायला, सराव करायला सर्वोत्तम आहे. मुलांना त्या वयात एकदा रुची निर्माण झाली की मग मुले १०-१२वर्षाची होईपर्यंत अत्यंत सफाईदारपणे मराठी बोलू, लिहू शकतात.संभाषण करू शकतात. घरातल्या घरात मराठी सराव करण्यापेक्षा इतर मुलांबरोबर मिळून नियमित मराठी शिकण्याची सोय असल्यास हा अभ्यास सुखकारक याची जाणीव झाली.
इथल्या मराठीच्या शोधामध्ये डेट्रॉईटच्या महाराष्ट्र मंडळाच्या साप्ताहिक मराठी शाळेबद्दल माहिती मिळाली. १२-१५ पटसंख्या आणि २-३ शिक्षक असा मराठीच्या उत्साही शिलेदारांचा दर रविवारी भरणारा सोहळा खूपच कौतुकास्पद वाटला. मराठीची सेवा करायची, आपल्या पुढच्या पिढीला मराठीशी जोडायची याहून चांगली संधी आणि चांगले व्यासपीठ मिळणार नाही याची खात्री पटली आणि २०१८ ला मीही डेट्रॉईटच्या दक्षिणेकडील, Canton शहरातील शाळेत स्वयंसेवक म्हणून रुजू झालो.
एव्हाना दुसऱ्या मुलीचा पण जन्म झाला होता. आपल्या मूळ भाषेची गोडी लावायची जबाबदारी फक्त कुटूंबापुरती मर्यादित न राहता, आई-वडिलांच्या आग्रहास्तव शाळेत येणाऱ्या, मराठीला “मरॉटी” म्हणणाऱ्या अजून १२-१५ मुलांची पण जबाबदारी घेतली होती. महाराष्ट्रात शिकत असताना इंग्रजी ही ‘वाघिणीचे दूध’ वाटायची पण इथे इंग्रजांच्याच देशात वाढणाऱ्या मुलांना मराठी शिकवत असताना मराठीच खरी ‘Tiger’s milk’ आहे ह्याची प्रचिती यायला लागली. ‘ई’ ईडलिंबूचा पेक्षा, ‘ई’ e-mail चा, ‘उ’ उखळीचा पेक्षा ‘उ’ UNO चा अशी उलटी गंगा वाहवावी लागली. In this country of Plenty, ‘अति तिथे माती’ चा अर्थ समजावून सांगताना दमछाक होत होती. या Gen-Alphaच्या कलेकलेने घेत आता आमचा ABCD ते अबकड चा साप्ताहिक प्रवास चालू झाला होता.
२०१९-२० मध्ये करोनाच्या थैमानामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य नव्हत्या पण Google Classroom च्या माध्यमातून आम्ही मराठीशी नाळ कायम जोडलेली ठेवली. मराठी भाषा-परंपरांना साजेसे शाळेतील उपक्रम, गणेशोत्सवात शाळेतील मुलांनी सादर केलेले मराठीशी नातं सांगणारे उत्तमोत्तम कार्यक्रम यांनी शाळेची माहिती लोकांमध्ये पोचली आणि २०२४-२५ येईपर्यंत Canton शाळेची विद्यार्थीसंख्या १२-१५ वरून पार ७५च्या पलीकडे गेली. बहुतांशी पालकांना भासणारी मराठी शिक्षणाची उणीव आणि त्यातून मराठी शाळेला मिळणारा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आम्ही अजून एक शाखा उघडली. इथल्या मातीशी-हवामानाशी जवळीक ठेवून, भारतीय-मराठी परंपरा सण, इतिहास याच्याशी पण दुवा साधत BMM-भारती विद्यापीठाने रचलेला अभ्यासक्रम हा या सर्वाचा भरभक्कम पाया आहे. तसेच महाराष्ट्र मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांना मिळणाऱ्या संधी, त्यांच्याच वयाच्या आणि त्यांच्याच सारखे इंग्रजाळलेले मराठी बोलणाऱ्या मुलांबरोबर वावरायच्या संधी, मराठीची उणीव काही प्रमाणात नक्कीच भरून काढतात. मुलांच्या careerच्या दृष्टीने विचार करता, २०१९ पासून मिशीगन राज्याने मराठीला ‘परकीय भाषेचा’ दर्जा दिल्यामुळे, विद्यार्थी मराठी शिकून-योग्य परिक्षा देऊन Highschool मध्ये २ credits सहज मिळवू शकतात.
अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारुन आता इथेच स्थायिक झाल्यावर, Gen-alpha च्या ओंजळीत मराठीचा काहीतरी मेवा ठेवायची संधी मिळाल्याची भावना खूपच सुखद आहे. स्वत:च्या दोन्ही मुली आणि साप्ताहिक शाळेमधील इतर मुलांना घरी, भारतातील आजी-आजोबांबरोबर, नातेवाईकांबरोबर मराठीतून गप्पागोष्टी करताना, हसताना खिदळताना बघून खूपच छान वाटतं. मुलींना घेऊन पुण्यात एका लग्नसमारंभात गेलेलो असताना एका आजींबरोबर दोन्ही मुलींनी इतक्या छान गप्पा मारल्या की आजी नंतर मुलींच्या मराठीचं कौतुक करताना रडल्या, म्हणाल्या मुलींच्या मराठीच्या वापरावरून मुली अमेरिकेत वाढतायेत असं वाटतच नाहीये, माझ्या सख्या नातींनी पण जर माझ्याशी अशा गप्पा मारल्या असत्या तर आयुष्याच्या शेवटी काही खंत राहिली नसती… आजींची अशी पावती मनाला चटका लावून गेली आणि सातासमुद्रापार आपण घेत असलेल्या मराठीच्या परिश्रमाचं चीज झाल्याचं समाधान वाटलं.
एवढ्यावरच सुखावून जाऊन इथेच न थांबता मराठी शाळेच्या माध्यमातर्फे मराठीची सेवा करत राहायची मनोमन इच्छा आहे. नुकताच ऑक्टोबर २०२४ मध्ये मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्रदान झाला आहे, तेंव्हा तिचा अभिजातपणा, classical status जपायची जबाबदारी इथे सातासमुद्रापार आपल्या सर्वांवर पण आहे. इथे लहानाचे मोठे होणाऱ्यांनी आपल्या मायबोली मायमराठीला, “My Marathi” म्हणून मिरवलं की अभिजात भाषेचा दर्जा पुनःश्च सिद्ध करायची गरज पडायची नाही. इथल्या समाजात वावरताना आपल्या मराठी भाषेचे-संस्कृतीचे अदृश्य धागे गुंफून जो कोष बनवतोय, त्यातून पुढे जाऊन मराठीत संवाद साधू शकतील अशी सुंदर फुलपाखरं बहरतील अशी खात्री आहे.
America Born Confused Desi म्हणजेच ABCD मुलांना मराठीच ‘गमभन’चं भान आलं, श्लोक, प्रार्थना, कविता-साहित्य यातलं थोडंफार समाजलं, उत्तम चित्रपट-नाटक कलाकृती समजल्या तसेच आपले सण, भारत-महाराष्ट्राबद्दल समजले, आजीआजोबांशी, बहिणभावंडांशी मराठीत गप्पा मारता आल्या आणि पुणेरी पाट्यांमधला खोचक पण थेट अर्थ कळून हसू आलं की माझी मोहिम फत्ते! मग इथे अमेरिकेत मराठी कशासाठी? ह्या प्रश्नाची उकल पावलोपावली होईल पण त्यासाठी फक्त इच्छा नाही तर मुलांबरोबर १०-१२ वर्षाची तपश्चर्या लागेल. A for “Apple” जसं यायला पाहिजे तसेच A for “Aapli मराठी” ह्याची पण आठवण राहिलीच पाहिजे.
- अभिजित जोगदेव | कँटन, डेट्रॉईट मिशीगन | मराठी शाळा मुख्याधापक आणि BMM समन्वयक
abhijog24@gmail.com | +1 248.778.8318
(फेब्रुवारी २०, २०२५)
Tuesday, October 29, 2024
पुन्हा एकदा दिवाळी…
पुन्हा एकदा दिवाळी…
ओळीत मांडून पणत्या, रचून दिव्यांची आरास
लखलखाट घरोघरी, उन्मेषाचे कारण आहे तसे खास
घनघोर रणकंदन घडले दूर देशी असुर सेनेचे,
रामराया परतले होते आज, पतन करून दशाननाचे
चौदा वर्षाचा वनवास घडला कैकेयीच्या हक्कासाठी,
कांचनमृगा मागे धावले श्रीराम जानकीच्या हट्टापायी.
समुद्रापार लंकेस घेवोनि गेला सीतामाईस क्रूरकर्मा,
त्रेतायुगातील पापाचा घडा भरू लागला होता त्याचा आता.
घेऊन सोबतीला जांबुवंत आणि महावीर हनुमंत,
“जय श्रीराम” म्हणताच चढे स्फुलिंग, अन दुमदुमे आसमंत.
सागरसेतू बांधून तरंगता, वानरसेना घुसली लंकेत आरपार,
सोडवून आणलेच प्राणप्रियेस, जाऊन थेट समुद्रापार.
सुखद वाटे आता तो संघर्ष, ती पर्णकुटी अन वनवास,
असह्य होत होता कबरी खालचा विजनवास
घनघोर रणकंदन घडले ह्याच देशी पुन्हा एकदा,
माझा रामलल्ला परतला, त्याच्या घरी पुन्हा एकदा.
ओळीत मांडून पणत्या, रचून दिव्यांची आरास
लखलखाट घरोघरी, उन्मेषाचे कारणच तसे आहे
पुन्हा एकदा खास…
-अभिजीत जोगदेव
( २०२४ ची दिवाळी खास आहे. अयोध्येतील राम मंदिर पुनर्निर्माण पूर्ण झाले आहे आणि रामलल्ला त्यांच्या जन्मभूमीत दिमाखदारपणे पुन्हा एकदा परतले आहेत…पुन्हा एकदा दिवाळी!)
Saturday, July 13, 2024
चिरंजीवी
Immortal Solitude
Monday, January 30, 2023
'काळ' आला होता पण 'वेळ' आली नव्हती
'काळ' आला होता पण 'वेळ' आली नव्हती
काळ, वेळ कोणालाच सांगून येत नाही म्हणतात... आणि आपल्या आयुष्यात क्वचितच असा प्रसंग येतो की काळ आणि वेळ ह्यातल्या अत्यंत नाजुक रेषेवरून आपली कसरत होते आणि त्या प्रसंगांकडे मागे वळून बघितल्यावर, ‘काळ’ तिथेच थिजलेला दिसतो पण आपण कालचक्राबरोबर पुढे निघून गेलेलो असतो.
‘वेळे’ प्रमाणेच ‘स्थळ’ पण अजून एक अशी मिती आहे, जी जुळून यायला लागते. ह्याचा सुयोग/कुयोग असेल तरच ‘काळा’चा घाला बसतो. ‘स्थळ’ आणि ‘वेळ’ ह्यात थोडं उन्नीस-बिस झालं की मग माझ्या सारखा माणूस स्वत:चा थरारक अनुभव इतरांना, स्वत: सांगू शकतो.
माझी मोठी मुलगी, रेवा आणि धाकटी, नोवा, ह्यांना Summer vacation मधे कुठेतरी फिरायला घेऊन जायची योजना आखत होतो. रेवाला adventurous rides आवडत असल्यामुळे शिकागोला Six Flags ला जायचं ठरलं. मग तिथेच college मधल्या मित्राकडे २-४ दिवस राहून धमाल करायचा बेत केला. शिकागो चा Morning Rush hour टाळायला सकाळी लवकर आवरून आम्ही चौघे डेट्रॉईटहून निघालो. गाणी, गप्पा गोष्टी करत करत शिकागोला कधी पोचलो कळलंच नाही. आजचा दिवस माझ्या मित्राकडे, सिद्धेश कुलकर्णी कडे आराम करून उद्या Six Flags ला जाण्यासाठी सगळेच excited होते.
दुसऱ्या दिवशी, सिद्धेश, त्याची बायको ऋचा, मुलगी अस्मि, आणि आम्ही चौघे, असे Six Flags ला adventurous rides वर झेंडे गाडायला पोचलो. DC Comics characters आणि Roller Coasters, Splash Rides बघून तर मुलांना काय करू काय नको असं झालं होतं. तिथल्या Max Force, X-Men, RagingBull, Superman rides बघून आम्हाला पण धडकी भरत होती पण पहिल्या एक-दोन rides सर्वात भन्नाट करायच्या असं ठरवलं. Raging Bull मधे २०० फुटावरून ७० मैल प्रतितास वेगानी खाली येताना ‘भान हरपणं’ काय असतं ह्याची प्रचिती आली. Max Force आणि Raging Bull अशा पहिल्याच rides केल्यावर आमचं Adrenaline पण roller coaster वर आहे असं वाटत होतं.
(डावीकडून) सिद्धेश, ऋचा आणि मी, Raging Bull मधे घसा फोडून ओरडताना
Final Exam मधे पहिले दोन पेपर Algebra आणि Geometry चे झाल्यावर इतर Papers जसे क्षुल्लक वाटतात तसं पुढच्या rides ना वाटायला लागलं होतं.
तरीही प्रत्येक ride ला रांगेमध्ये थांबलेलं असताना, ride मधे बसताना एक काय अनेक विचार- Roller Coaster चा ‘एखादा’ Bolt पडला, तुटला तर?, Ride एकदम वर असताना नेमका आपलाच seatbeltच निघाला तर? Ride संपताना break नाही लागला तर?.. काही rides तर एवढ्या खतरनाक होत्या की एकदा माझ्या शेजारच्या गोऱ्याला चक्क मी रामरक्षा म्हणताना ऐकलं. 🙂
असो,तर roller coaster सुरू झाला की सर्वाचा विसर पडत होता आणि सरते शेवटी रोमांचकारी अनुभवाची सरशी होत होती. Max Force Ride ला तर front seat मिळाली होती. ती ride करताना सारखं मनात येत होतं एखाद्या Engine fail झालेल्या पायलटला, cockpit मधून विमान खाली येताना कसं दिसत असेल?.. नुसत्या कल्पनेनी पोटात गोळा येत होता.
माझ्या बायकोनी, पूनमनी मुलांच्या rides ची जबाबदारी घेतल्यामुळे, मी, सिद्धेश आणि ऋचा ह्या सगळ्या rides चा मनसोक्त आनंद घेत होतो.
दिवसभर rides करून दमून जायला झालं होतं. मेंदूपण म्हणत होता आता Adrenalineचा पुरवठा संपलाय, उदया भेटू!
त्यामुळे आता एखाद्या restaurant मधे मस्त जेवण करून घरी जाऊ असं ठरवलं. वाटेवर Libertyville गावामध्ये एक Mexican restaurant पसंतीस पडलं. रुचकर Mexican dishes, बरोबर Sangria-Mojito आणि Six Flags मधे केलेली धमाल आठवत, Dinner plan एकदम फक्कड झाला. गप्पांच्या ओघात सिद्धेश, ऋचा आणि मला जरा जास्त झाली होती असं वाटत होतं नव्हे झालीच होती. माझी बायको, पूनम, Designated Driver असल्यामुळे, तिनी steering हाती घेतलं. मी आणि सिद्धेश सर्वात मागे, मधल्या row मधे ३ लहान मुली आणि पुढे ऋचा आणि पूनम. गाडी भरली आणि मुलांची मस्ती चालू झाली म्हणून पूनम त्यांना झापत होती. गाडी निघायची ‘वेळ’ झाली आणि आम्ही घराच्या दिशेने कूच केली. थोड्या वेळात मुलं झोपून गेली. रात्रीचे १०-१०:१५ वाजले होते आणि रात्रीच्या नीरव शांततेत, Vernon Hillsच्या अंधाऱ्या freeway वरुन, ओसाड माळरानं, शेतं मागे टाकत गाडीनी आता चांगला ‘मौसम’ पकडला होता.
एवढ्यात... गाडीच्या मागे धडाम-थडथड असा मोठा आवाज आला आणि मुलं पण खडबडून जागी होऊन “काय झालं? काय झालं?” विचारायला लागली. मला वाटलं एखादा Semi Truck कुठल्या तरी गाडीला धडकलेला दिसतोय. काय घडलंय बघायला म्हणून गाडीच्या मागच्या काचेतून डोकावून बघितलं तर... एक Aircraft रस्त्यावरून घसरत घसरत आमच्या दिशेनी येत होतं. मी जोरात ओरडलो ‘विमान! विमान येतंय!’. आम्हाला जरा जास्त झालीये असंच पूनमला वाटत असल्यामुळे तिचा विश्वास बसत नव्हतां. ह्या गडबडीमधे गाडीचा वेग मंदावला आणि सभोवताल पण मंदावून गेलाय असा भास झाला.
आरडाओरडा करून परत मागे बघितलं तर ते विमान कशाला तरी (बहुदा खांबाला) धडकलं होतं आणि गिरकी घेत, घसरत आमच्या गाडी कडे सरकत येत होतं. पूनम rear view mirror मधे त्या काळोख्या आंधारात मागचा अंदाज घेत होती आणि तिला ते पांढरं धूड सरपटताना दिसलं, तस्सं तीनी आमची गाडी पुढे दामटली. गाडी पुढे जाता जाता, त्या गिरकी घेणाऱ्या विमानाचा उजवा पंख आमच्या गाडीच्या rear window च्या अगदी जवळून गेलेला मला दिसला. जेमतेम 4-6 इंचाचं अंतर राहिलं असेल. ‘काळ’ हा आपण चित्रांमध्ये नेहमी काळा बघतो पण इथे आम्ही पांढऱ्या विमानाच्या रूपात काळाला बघत होतो… आणि तो आमच्या पासून अगदी पावला दोनपावलावर थयथयाट करत होता आणि ‘वेळ’ साधायचा प्रयत्न करत होता.
शेवटी ते विमानाचं धूड road divider वर जाऊन धडकलं आणि अजून एक गिरकी घेऊन शांत झालं. एव्हाना आमची गाडी पण सुखरूप रस्त्याच्या कडेला घेतली होती आणि आम्ही विमानाच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. सर्व शांत होतं पण आमची विमानाजवळ जायची काही धडगत होत नव्हती. लगेच 911 ला फोन केला. आमची तंतरली असल्यामुळे तिला आमचा ठाव-ठिकाणा सांगायला जरा कष्टच पडले. त्या First Correspondent नी पण आम्हाला पुन्हा पुन्हा विचारलं, “Repeat, It’s an airplane crash on the road??”, “Repeat..” Emergency System ची कमाल आणि तिथे पुढच्या 2 मिनिटांमधे Ambulance, 2-3 Fire Trucks, Police cars घोंघावत पोहचल्या पण. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला आणि त्या विमानातील प्रवासी, वैमानिकांसाठी प्रार्थना करत आम्ही तिथून घराकडे निघालो.
धक्क्यातून अजून पूर्ण सावरलो नसल्यामुळे, पूनम ट्रॅफिक लाइट वर ऋचाला घाईघाईत विचारात होती, Red light ला थांबायचं असतं का वळालेलं चालतं? आणि ऋचापण तिला म्हणत होती, “मला काहीच कळत नाहीये!, बहुतेक वळालेलं चालतं..” Cocktails आणि विमानाच्या Tailspin मुळे सगळ्यांचंच डोकं Spin झालं होतं. कसेबसे सावरत शेवटी आम्ही 11:30-12 ला घरी पोचलो. Roller Coaster चा Adrenaline rush, cocktails ची झिंग, सगळं काही क्षणामध्ये खाडकन उतरलं होतं. मला परत परत Max Force वरच्या ride मधलाच विचारआठवत होता, ‘Engine fail झालेल्या पायलटला, cockpit मधून विमान खाली येताना कसं दिसत असेल?’
घरी जाऊन Internet, TV वर accident चे काही details मिळतायेत का ह्याचा शोध घेत होतो. काही वेळानी local Newspaper ला online बातमी आली,
‘Engine failure मुळे एका private विमानाचं Milwaukee Av. वर Emergency Landing!’.
थोडा अजून शोध घेतल्यावर कळलं, ह्या Piper Cherokee विमानाच्या इंजिनात Michigan lake वर उडत असताना बिघाड झाला आणि pilot float करत करत Libertyville पर्यन्त आला होता. Emergency Landing च्या चक्कर मधे आमच्या मागे land झाला होता.
आम्ही ‘स्थळावर’ आलो होतो, failed engine aircraft च्या रूपात ‘काळ’ पण आला होता मात्र आमची ‘वेळ’ आली नव्हती. आता timeline वर मागे वळून बघितलं की ते ‘स्थळ’, ‘काळ’ तिथेच थिजून गेलेला दिसतो आणि आम्ही मात्र पूनमनी मुलींना ओरडण्यात जास्त वेळ न घालवल्यामुळे, मोक्याच्या क्षणी गाडी accelerate केल्या मुळे आज तुम्हाला थरारक अनुभव स्वत: सांगू शकतोय.
Sunday, November 13, 2022
तावदान आणि ती
तावदान आणि ती
दाटला काळोख अन् थिजला सभोवतालफाटले आभाळ, झेलून विजेचा तडतडाट.पर-जनांचे ताशेरे सोसून, लागे अश्रुंची ही धार,सुखरूप ठेवी तेववत, तिला आत, जरी जन्मला असे हा सोसून धगधगता विखार.
- अभिजित जोगदेव
Microsoft Copilot's attempt at a translation. (What a beauty by AI'tic poet)A glass pane & She
Battled the dark storm, and tamed the wild,Broke the sky, endured the lightning's child.Drinking the tears of loved ones, flows this stream,Keeping her happy, now seems a dream,Even though born in such a boiling scheme.

A glass pane & She
Sunday, November 6, 2022
Gaurav@40
आज सांगतोय त्याची गोष्ट.... पण फार नाहीये सोपी,
भेटला मला हा तेंव्हा, जेंव्हा घालायचो आम्ही,
वर पांढरा शर्ट आणि खाली खाकी अर्धी चड्डी,
मुंजीत जेवला माझ्या पठ्या, पुरी-श्रीखंडाच्या वाटी,
पण खरी ओळख मिळवली, खाऊन लिंबाच्या भरपूर फोडी..
१-२ वर्षे वाटा झाल्या वेगळ्या, गेला हा जेंव्हा ज्ञान प्रबोधिनीच्या वाटी.
झेपला नाही आमचा Bond म्हणून, धाडून दिला परत, भावे स्कूल च्या दारी.
असा गौऱ्या उर्फ गौपी, ज्याची गोष्ट फार नाही सोपीऽ
अभ्यास, तबला, अथवा असो Badminton,
सगळ्यांमधे असायचा हा नेहमीच नंबर one.
Group-Dच्या गणितांची जेव्हा वाटायची भिती,
नासामधे पेपर धाडून यानी केली गुंग आमची मती
सर्व शिक्षकांचा होता, असा लाडका आमचा गौपी,
पण काहींना भरावयाचा धडकी, बंद करून टाकतो तुमचाclass, अशी देऊन धमकी
असा गौऱ्या उर्फ गौपी, ज्याची गोष्ट फार नाही सोपीऽ
भावे, नुमवि ते एकत्र Engineering at विद्यापीठ भारती,
रंगीत मण्यांची पाटी ते पार Project Tata Motors साठी.
बघत आलोय ह्याला चालवताना Sunny, Splendor आणि Silver Santro गाडी,
अमेरिकेत ह्याची ride, long shiny black Audi
तरी जमिनीवर well grounded आहे आमचा गडी.
असा गौऱ्या उर्फ गौपी, ज्याची गोष्ट फार नाही सोपी ऽ
तुका म्हणे तसा, मऊ मेणाहूनि हा विष्णुदास,
भले तरि देई कासेची लंगोटी । आणि नाठाळाचे माथी हाणी हा काठी ॥
असा थोडा तडकाफडकी थोडा, तापट my buddy,
करायची ह्यानी लफडी, आणि सोडवायची आम्ही घडोघडी.
असा गौऱ्या उर्फ गौपी, ज्याची गोष्ट फार नाही सोपी.
वर्षे सरली चाळीस, तरी दोस्ती अखंड,
असो पुणे, भारत अथवा असो living in America खंड.
Detroit Pune अंतरामुळे, Missing भाईची party@40,
Stay blessed forever मित्रा, and all the best to strike a century!
गणपती आणि बॅक्टेरिया
सार्वजनिक गणेशविसर्जन करताना-केल्यावर मूर्तींची होणारी हेळसांड बघून मन विषण्ण झाल्यावर मी डोळे मिटून घेतले होते. अजून काही प्रश्नमाश्या घों...
-
(MaayMarathi-WhyMarathi-MyMarathi) पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन । नेवो नेते जड तनुस या दूर देशास द...
-
तारुण्याच्या पहाटे नको असलेला हा एकटेपणा, संधिकाली त्यालाच गिळून आता मारतोय मला मिठी, सर्व उत्तरे बरोबर आली तरी हा ब्रह्मराक्षस भित्याच्या...
-
करोना आणि एक प्लेट भजी काल परवाचीच गोष्ट आहे, फार पूर्वी नाही २०१९ ची पूर्वेकडून जगभर पसरलेल्या वणव्यांची. सुरवात झाली होती ऑस्ट्रेलियातल्या...



