'काळ' आला होता पण 'वेळ' आली नव्हती
काळ, वेळ कोणालाच सांगून येत नाही म्हणतात... आणि आपल्या आयुष्यात क्वचितच असा प्रसंग येतो की काळ आणि वेळ ह्यातल्या अत्यंत नाजुक रेषेवरून आपली कसरत होते आणि त्या प्रसंगांकडे मागे वळून बघितल्यावर, ‘काळ’ तिथेच थिजलेला दिसतो पण आपण कालचक्राबरोबर पुढे निघून गेलेलो असतो.
‘वेळे’ प्रमाणेच ‘स्थळ’ पण अजून एक अशी मिती आहे, जी जुळून यायला लागते. ह्याचा सुयोग/कुयोग असेल तरच ‘काळा’चा घाला बसतो. ‘स्थळ’ आणि ‘वेळ’ ह्यात थोडं उन्नीस-बिस झालं की मग माझ्या सारखा माणूस स्वत:चा थरारक अनुभव इतरांना, स्वत: सांगू शकतो.
माझी मोठी मुलगी, रेवा आणि धाकटी, नोवा, ह्यांना Summer vacation मधे कुठेतरी फिरायला घेऊन जायची योजना आखत होतो. रेवाला adventurous rides आवडत असल्यामुळे शिकागोला Six Flags ला जायचं ठरलं. मग तिथेच college मधल्या मित्राकडे २-४ दिवस राहून धमाल करायचा बेत केला. शिकागो चा Morning Rush hour टाळायला सकाळी लवकर आवरून आम्ही चौघे डेट्रॉईटहून निघालो. गाणी, गप्पा गोष्टी करत करत शिकागोला कधी पोचलो कळलंच नाही. आजचा दिवस माझ्या मित्राकडे, सिद्धेश कुलकर्णी कडे आराम करून उद्या Six Flags ला जाण्यासाठी सगळेच excited होते.
दुसऱ्या दिवशी, सिद्धेश, त्याची बायको ऋचा, मुलगी अस्मि, आणि आम्ही चौघे, असे Six Flags ला adventurous rides वर झेंडे गाडायला पोचलो. DC Comics characters आणि Roller Coasters, Splash Rides बघून तर मुलांना काय करू काय नको असं झालं होतं. तिथल्या Max Force, X-Men, RagingBull, Superman rides बघून आम्हाला पण धडकी भरत होती पण पहिल्या एक-दोन rides सर्वात भन्नाट करायच्या असं ठरवलं. Raging Bull मधे २०० फुटावरून ७० मैल प्रतितास वेगानी खाली येताना ‘भान हरपणं’ काय असतं ह्याची प्रचिती आली. Max Force आणि Raging Bull अशा पहिल्याच rides केल्यावर आमचं Adrenaline पण roller coaster वर आहे असं वाटत होतं.
(डावीकडून) सिद्धेश, ऋचा आणि मी, Raging Bull मधे घसा फोडून ओरडताना
Final Exam मधे पहिले दोन पेपर Algebra आणि Geometry चे झाल्यावर इतर Papers जसे क्षुल्लक वाटतात तसं पुढच्या rides ना वाटायला लागलं होतं.
तरीही प्रत्येक ride ला रांगेमध्ये थांबलेलं असताना, ride मधे बसताना एक काय अनेक विचार- Roller Coaster चा ‘एखादा’ Bolt पडला, तुटला तर?, Ride एकदम वर असताना नेमका आपलाच seatbeltच निघाला तर? Ride संपताना break नाही लागला तर?.. काही rides तर एवढ्या खतरनाक होत्या की एकदा माझ्या शेजारच्या गोऱ्याला चक्क मी रामरक्षा म्हणताना ऐकलं. 🙂
असो,तर roller coaster सुरू झाला की सर्वाचा विसर पडत होता आणि सरते शेवटी रोमांचकारी अनुभवाची सरशी होत होती. Max Force Ride ला तर front seat मिळाली होती. ती ride करताना सारखं मनात येत होतं एखाद्या Engine fail झालेल्या पायलटला, cockpit मधून विमान खाली येताना कसं दिसत असेल?.. नुसत्या कल्पनेनी पोटात गोळा येत होता.
माझ्या बायकोनी, पूनमनी मुलांच्या rides ची जबाबदारी घेतल्यामुळे, मी, सिद्धेश आणि ऋचा ह्या सगळ्या rides चा मनसोक्त आनंद घेत होतो.
दिवसभर rides करून दमून जायला झालं होतं. मेंदूपण म्हणत होता आता Adrenalineचा पुरवठा संपलाय, उदया भेटू!
त्यामुळे आता एखाद्या restaurant मधे मस्त जेवण करून घरी जाऊ असं ठरवलं. वाटेवर Libertyville गावामध्ये एक Mexican restaurant पसंतीस पडलं. रुचकर Mexican dishes, बरोबर Sangria-Mojito आणि Six Flags मधे केलेली धमाल आठवत, Dinner plan एकदम फक्कड झाला. गप्पांच्या ओघात सिद्धेश, ऋचा आणि मला जरा जास्त झाली होती असं वाटत होतं नव्हे झालीच होती. माझी बायको, पूनम, Designated Driver असल्यामुळे, तिनी steering हाती घेतलं. मी आणि सिद्धेश सर्वात मागे, मधल्या row मधे ३ लहान मुली आणि पुढे ऋचा आणि पूनम. गाडी भरली आणि मुलांची मस्ती चालू झाली म्हणून पूनम त्यांना झापत होती. गाडी निघायची ‘वेळ’ झाली आणि आम्ही घराच्या दिशेने कूच केली. थोड्या वेळात मुलं झोपून गेली. रात्रीचे १०-१०:१५ वाजले होते आणि रात्रीच्या नीरव शांततेत, Vernon Hillsच्या अंधाऱ्या freeway वरुन, ओसाड माळरानं, शेतं मागे टाकत गाडीनी आता चांगला ‘मौसम’ पकडला होता.
एवढ्यात... गाडीच्या मागे धडाम-थडथड असा मोठा आवाज आला आणि मुलं पण खडबडून जागी होऊन “काय झालं? काय झालं?” विचारायला लागली. मला वाटलं एखादा Semi Truck कुठल्या तरी गाडीला धडकलेला दिसतोय. काय घडलंय बघायला म्हणून गाडीच्या मागच्या काचेतून डोकावून बघितलं तर... एक Aircraft रस्त्यावरून घसरत घसरत आमच्या दिशेनी येत होतं. मी जोरात ओरडलो ‘विमान! विमान येतंय!’. आम्हाला जरा जास्त झालीये असंच पूनमला वाटत असल्यामुळे तिचा विश्वास बसत नव्हतां. ह्या गडबडीमधे गाडीचा वेग मंदावला आणि सभोवताल पण मंदावून गेलाय असा भास झाला.
आरडाओरडा करून परत मागे बघितलं तर ते विमान कशाला तरी (बहुदा खांबाला) धडकलं होतं आणि गिरकी घेत, घसरत आमच्या गाडी कडे सरकत येत होतं. पूनम rear view mirror मधे त्या काळोख्या आंधारात मागचा अंदाज घेत होती आणि तिला ते पांढरं धूड सरपटताना दिसलं, तस्सं तीनी आमची गाडी पुढे दामटली. गाडी पुढे जाता जाता, त्या गिरकी घेणाऱ्या विमानाचा उजवा पंख आमच्या गाडीच्या rear window च्या अगदी जवळून गेलेला मला दिसला. जेमतेम 4-6 इंचाचं अंतर राहिलं असेल. ‘काळ’ हा आपण चित्रांमध्ये नेहमी काळा बघतो पण इथे आम्ही पांढऱ्या विमानाच्या रूपात काळाला बघत होतो… आणि तो आमच्या पासून अगदी पावला दोनपावलावर थयथयाट करत होता आणि ‘वेळ’ साधायचा प्रयत्न करत होता.
शेवटी ते विमानाचं धूड road divider वर जाऊन धडकलं आणि अजून एक गिरकी घेऊन शांत झालं. एव्हाना आमची गाडी पण सुखरूप रस्त्याच्या कडेला घेतली होती आणि आम्ही विमानाच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. सर्व शांत होतं पण आमची विमानाजवळ जायची काही धडगत होत नव्हती. लगेच 911 ला फोन केला. आमची तंतरली असल्यामुळे तिला आमचा ठाव-ठिकाणा सांगायला जरा कष्टच पडले. त्या First Correspondent नी पण आम्हाला पुन्हा पुन्हा विचारलं, “Repeat, It’s an airplane crash on the road??”, “Repeat..” Emergency System ची कमाल आणि तिथे पुढच्या 2 मिनिटांमधे Ambulance, 2-3 Fire Trucks, Police cars घोंघावत पोहचल्या पण. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला आणि त्या विमानातील प्रवासी, वैमानिकांसाठी प्रार्थना करत आम्ही तिथून घराकडे निघालो.
धक्क्यातून अजून पूर्ण सावरलो नसल्यामुळे, पूनम ट्रॅफिक लाइट वर ऋचाला घाईघाईत विचारात होती, Red light ला थांबायचं असतं का वळालेलं चालतं? आणि ऋचापण तिला म्हणत होती, “मला काहीच कळत नाहीये!, बहुतेक वळालेलं चालतं..” Cocktails आणि विमानाच्या Tailspin मुळे सगळ्यांचंच डोकं Spin झालं होतं. कसेबसे सावरत शेवटी आम्ही 11:30-12 ला घरी पोचलो. Roller Coaster चा Adrenaline rush, cocktails ची झिंग, सगळं काही क्षणामध्ये खाडकन उतरलं होतं. मला परत परत Max Force वरच्या ride मधलाच विचारआठवत होता, ‘Engine fail झालेल्या पायलटला, cockpit मधून विमान खाली येताना कसं दिसत असेल?’
घरी जाऊन Internet, TV वर accident चे काही details मिळतायेत का ह्याचा शोध घेत होतो. काही वेळानी local Newspaper ला online बातमी आली,
‘Engine failure मुळे एका private विमानाचं Milwaukee Av. वर Emergency Landing!’.
थोडा अजून शोध घेतल्यावर कळलं, ह्या Piper Cherokee विमानाच्या इंजिनात Michigan lake वर उडत असताना बिघाड झाला आणि pilot float करत करत Libertyville पर्यन्त आला होता. Emergency Landing च्या चक्कर मधे आमच्या मागे land झाला होता.
आम्ही ‘स्थळावर’ आलो होतो, failed engine aircraft च्या रूपात ‘काळ’ पण आला होता मात्र आमची ‘वेळ’ आली नव्हती. आता timeline वर मागे वळून बघितलं की ते ‘स्थळ’, ‘काळ’ तिथेच थिजून गेलेला दिसतो आणि आम्ही मात्र पूनमनी मुलींना ओरडण्यात जास्त वेळ न घालवल्यामुळे, मोक्याच्या क्षणी गाडी accelerate केल्या मुळे आज तुम्हाला थरारक अनुभव स्वत: सांगू शकतोय.
Superbly narrated abhya.....seems like Hollywood movie scene.....but with no special FX......REAL... Pilot chi bekkar adventure ride zali asel.....😀
ReplyDelete