करोना आणि एक प्लेट भजी

काल परवाचीच गोष्ट आहे, फार पूर्वी नाही २०१९ ची
पूर्वेकडून जगभर पसरलेल्या वणव्यांची.
सुरवात झाली होती ऑस्ट्रेलियातल्या जंगलातल्या वणाव्यानी,
अन् १९ चा शेवट झाला होता करोनाच्या ॐ फट स्वाहानी.
काढे झाले -वाफारे झाले, शंखध्वनिने वातावरण शुद्ध करून झाले,
करोनानी तोडले सगळे बंध आणि शाळा, कॉलेज, offices झाली एकामागे एक बंद.
महामारीनी सगळं जग झालं ठप्प, “ह्याला जबाबदार कोण?”
ह्यावर WHO मात्र मूग गिळून गप्प
Pfizer नी आणलं vaccine झर-झर,
मॉ’डरना’‘ म्हणे “मैं हुँ ना तो फिर किससे डरना’’.
वाटले भूतलावर प्रकटले साक्षात धन्वंतरी,
नंतर पटले निव्वळ ‘धन’ वसले ह्यांच्या ‘अंतरी’.
अंकल सॅमच्या डोक्यात आलं खूळ, ह्या वायरसचं आपण शोधायचंच मूळ,
वुहान मीट मार्केट की चायनिज लॅब की गुहेत लटकलेलं ते वटवाघूळ?
डोळे मोठ्ठे करून अंकलनी ‘छोट्या डोळ्यांवर’ आजमावला वट,
पलिकडून अनपेक्षित उत्तर आलं ‘चल, यहॅां से वट’’
माझी आजी नेहमी म्हणायची, शोधू नये नदीचा उगम अन ऋषिचं कूळ,
माझ्याकडून त्यात add झालंय, ‘करोनाचं वटवाघूळ’.
महासत्तांची जुंपली अन चालू झाली हीs मारामारी,
आमच्यापुढे मात्र एकच प्रश्न, ‘कशी संपायची ही महामारी?’
२०२० मध्ये झिंगाट सुटला करोनाचा वळू की वाघळू,
whatsappवर येणाऱ्या उपायांचा आम्ही करत बसलो, अवडक चवडक दामाडू
अल्फा-बिटा-गॅमा-डेल्टा..., अवघड होत चालला होता variantsचा पाढा,
आता वाटतंय बरा होता तो २९चाच पाढा अन बाबांचा एरंडेलाचा काढा.
असाच पाढा लांबता लांबता.. एक दिवस आला variant Lambda,
चोरून ऐकलं मी,vaccine सांगत होतं mask ला-
“लवकरच गूल करतो की नाही बघ मी ह्याचा डब्बा”
आपण पण काय कमी नाय, म्हणून, मनाशी निर्धार केला पक्का
तुळशीबागमधे गर्दीत चिरडून एंकाऊंटर करायचा ह्याचा अन लावायचा मोक्का.
‘मी पुन्हा येईन’ असे कोणीतरी बोलले ‘वर्षा’ ला फाड’फाड’ एकोणीस ‘वीस’ वेळा,
देवेंद्रांच माहित नाही पण एकवीस-बावीस वर्षी,करोनानी आणले ओमायक्रानला.
लक्षात येतंय का तुमच्या? ह्या डेल्टा च्या नादात आपला प्रवास चाललाय उलटा.
आप्त भेटल्यावर घ्यायचो गळाभेटी, आता वाटते अंतर आपले बरे सहाफूटी.
मुरडायचो नाकं सोवळ्या-ओवळ्याला, आता बाहेरून आलो की पळतोय लगेच आंघोळीला.
हँडशेक पेक्षा नमस्कार वाटतोय बरा, अन् कमरेचं सोडून लंगोटी आलीये तोंडाला.
गटारातला बॉल काढल्यावर, हात झटकून, चड्डीला पुसून viruses आम्ही पळवायचो
बिनदिक्कतपणे येता -जाता दरवाजाच्या कड्यांशी खेळायचो.
मित्राचा जोक आवडला की द्यायचो टपली नाहीतर कडक टाळी,
आता दिसतो करोना, जळी स्थळी अन् काष्ठी पाषाणी.
कोणीतरी परत द्या ते माझे सुहाने दिन ,
Sanitizer चोळून चोळून हात पुरते झालेत दीन.
स्टॉक मार्केट आणि बिटकॉइन मधे अनुभवली अभूतपूर्व तेजी
२०२२ कडे आता एकच मागणे, भेटू देत मित्र परत with कटिंग चाय अन् एक प्लेट भजी...